निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी
By राम शिनगारे | Published: September 13, 2023 07:29 PM2023-09-13T19:29:28+5:302023-09-13T19:30:53+5:30
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या होते ४० टक्के प्रमाण; १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा ही एकच जात असल्याची नोंद
छत्रपती संभाजीगनर : निजामाच्या काळातील गॅझेटियर ऑफ द निजामस् डमेनिअसनस् औरंगाबाद डिस्ट्रीक्ट- १८८४ नुसार औरंगाबाद जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या २ लाख ८८ हजार ८२४ एवढी होती. एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ४०.६३ टक्के असल्याची माहिती मराठा आरक्षण न्याय हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र बनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुणबी व मराठा एकच असल्याचे पुरावे देणाऱ्या पत्रकार परिषदेला अध्यक्ष प्रा. बनसोड यांच्यासह अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांनी कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. त्याविषयीचे असंख्य पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही प्रा. बनसोड यांनी केला. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता.
सन १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे. त्या गॅझेटियरच्या ई-आवृत्तीमध्ये मराठा व कुणबी एकच असल्याचा उल्लेख २००६ साली वगळण्यात आला. मात्र, मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक उल्लेख त्याच गॅझेटमध्ये सापडतात. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १८८४ साली ४०.६३ टक्के लोकसंख्या कुणबी समाजाची होती. हा कुणबी समाज म्हणजेच मराठा हाेय. मराठा कंट्री, मराठा बुक्स, मराठा ब्राम्हण असे उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहेत. कुणबी हा उल्लेख हा आजच्या मराठा जातीसाठीच असल्याचे विविध संदर्भातुन स्पष्ट होते असेही प्रा. बनसोड यांनी सांगितले. याविषयी डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी संशोधन केले असून, त्यांच्याकडे गॅझेटची मुळ प्रत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा ही एकच जात असल्याची नोंद केल्याचेही ते म्हणाले.
कुणबी-मराठामध्ये रोटी-बेटीचे व्यवहार
कुणबी व मराठामध्ये रोटी-बेटीचे असंख्य व्यवहार झालेले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयाणी डोणगावकर या कुणबीमध्ये येतात तर त्यांचे पती कृष्णा डोणगावकर मराठा मध्ये येतात. या प्रकारची असंख्य उदाहरणे आपल्याला देता येतील, असेही प्रा. रविंद्र बनसोड यांनी सांगितले.