शहरात फक्त 3 दिवस संचारबंदी लावा; व्यापारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 04:10 PM2020-07-03T16:10:26+5:302020-07-03T16:11:17+5:30
यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.
औरंगाबाद : बेशिस्त लोकांना प्रतिबंध करणे व परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शहरात १० ते १२ जुलैदरम्यान संचारबंदी लागू करण्यात यावी, यावर लोकप्रतिनिधी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यात गुरुवारी सुभेदारीत झालेल्या बैठकीत सहमती झाली. यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.
यावेळी खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे तसेच महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, माजी अध्यक्ष अजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शहरात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या आणि बेशिस्त नागरिकांबद्दल चिंता व्यक्त झाली. आ. शिरसाट व आ. दानवे यांनी शहरात १० दिवस संचारबंदी लागू करावी, असे नमूद केले. व्यापारी प्रतिनिधींनी १० दिवसांऐवजी तीन दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत मांडले.
आ. सावे यांनी सांगितले की, संचारबंदीत संपूर्ण किराणा दुकाने तसेच औषधी दुकानेही बंद ठेवण्यात यावीत. जिथे हॉस्पिटल आहे तिथे औषधी दुकाने उघडी ठेवावीत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोणालाही पास देऊ नये. अगदी लोकप्रतिनिधींनादेखील असे पास दिले जाऊ नये, असे केले तरच संचारबंदीचा उद्देश सफल होईल. आ. शिरसाट यांनी सांगितले की, संचारबंदीत जे विनाकारण बाहेर पडतील, त्यांना पोलिसांनी फटके मारावेत, तर आ. दानवे म्हणाले की, संपूर्ण शहरात संचारबंदी असावी.
लॉकडाऊन नकोच : मानसिंग पवार म्हणाले की, लॉकडाऊन केल्याने रुग्ण संख्या कमी झाली, असा अभ्यास झाला नाही. लॉकडाऊन करण्यामुळे सामाजिक प्रश्न वाढतील.