ऑक्सिजनमध्ये आत्मनिर्भर अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:12+5:302021-05-06T04:05:12+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या प्रकल्पांमुळे हवेतील ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या प्रकल्पांमुळे हवेतील ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. परंतु या प्रकल्पामुळे ऑक्सिजनसाठी घाटी, जिल्हा रुग्णालय पूर्णपणे आत्मनिर्भर होणार नसल्याची स्थिती आहे. कारण प्रकल्प उभारल्यानंतरही लिक्विड ऑक्सिजनवर रुग्णालयाची भिस्त कायम राहणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात रोज ५५ ते ६० टन ऑक्सिजन लागतो. गेली महिनाभर लिक्विड ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. परंतु सुदैवाने कोणत्याही गंभीर परिस्थितीला रुग्णालयांना सामोरे जावे लागले नाही. या सगळ्यात घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि अन्य ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याला वेग दिला जात आहे. या प्रकल्पांमुळे ऑक्सिजन टँकरची गरज भासणार नाही का, असे विचारले असता लिक्विड ऑक्सिजन गरजेचा आहे. त्याच्या पुरवठ्यात काही अडचण आली तर प्रकल्पाची मदत होईल. शिवाय या प्रकल्पामुळे वॉर्डांना म्हणजे ज्यांना प्रतिमिनीट ५ लीटर ऑक्सिजनची गरज आहे, अशांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. राजश्री सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. एम. आय. सय्यद यांनी बुधवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली.
---
फक्त ३ वॉर्ड होतील आत्मनिर्भर
घाटीत ऑक्सिजन प्रकल्पाचा ६० खाटांच्या प्रत्येकी ३ वॉर्डांना फायदा होईल. एका प्रकल्पातून दिवसभरात २०५ जम्बो सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होईल. असे तीन प्रकल्प होणार असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. म्हणजे केवळ ३ वॉर्ड ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होतील.
----
घाटीत सध्या १० लिक्विड ऑक्सिजन टँक.
रोज-१० ते १२ टन ऑक्सिजनची गरज.
------
असे होतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
सीएसआर फंडातून घाटीत, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयातील दिवसभरात २०५ सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होईल. त्याबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून घाटीत सर्जरी इमारतीसाठी ६० क्युबिक मीटर प्रतितास, सुपर स्पेशालिटी इमारतीसाठी ६० क्युबिक मीटर प्रतितास ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प होतील. मेल्ट्राॅनसाठी ६० क्युबिक मीटर प्रतितास ऑक्सिजन निर्मिती दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात ३ उपजिल्हा रुग्णालय, २ ग्रामीण रुग्णालयात आणि पैठण येथील आरोग्य प्रशिक्षणाच्या ठिकाणी प्रत्येकी २० क्युबिक मीटर प्रतितासचे प्रकल्प होतील. ६ कोटी ६० लाखांतून हे प्रकल्प होतील.
--
वॉर्डांना फायदा
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे वॉर्डांना फायदा होईल. प्रतिमिनीट ५ लीटर ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना त्याचा उपयोग होईल. त्यापेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असणारे, आयसीयूसाठी त्याचा वापर होणार नाही. पण बॅकअप म्हणून ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी
-
ऑक्सिजनची अडचण राहणार नाही
जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन निर्मित प्रकल्प बसविण्यात येणार आत्त. रोज २०५ जम्बो सिलिंडर इतके ऑक्सिजन निर्मिती यातून शक्य होईल. लिक्विड ऑक्सिजन संपला तरी कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा सामान्य रुग्णालय