विनयभंगाच्या गुन्ह्यात सश्रम कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:16+5:302021-02-25T04:05:16+5:30
उल्कानगरी येथून फिर्यादी महिला रिक्षात बसली असता, त्याआधीच या रिक्षात बसलेल्या आरोपीने या महिलेच्या खांद्यावर हात टाकून विनयभंग केला. ...
उल्कानगरी येथून फिर्यादी महिला रिक्षात बसली असता, त्याआधीच या रिक्षात बसलेल्या आरोपीने या महिलेच्या खांद्यावर हात टाकून विनयभंग केला. फिर्यादी रिक्षातून उतरली, तिने आरोपीला शिवीगाळ केली व दुसऱ्या रिक्षाने आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितले असता, तिनेही फिर्यादीला शिवीगाळ केली.
यासंदर्भात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक सरकारी वकील जनार्धन एस. जाधव यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्त्वाचे ठरले.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली भा. द. वि. कलम ३५४ (अ) अन्वये ६ महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, तसेच शिवीगाळ केल्याबद्दल कलम ५०४ अन्वये ३ महिने सश्रम कारावास आणि २०० रुपये दंड ठोठावला. पैरवी म्हणून सुभाष भुरके यांनी काम पाहिले. फिर्यादी महिला अशिक्षित आहे.