पतीला पेटवून देत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:02 PM2019-03-01T14:02:28+5:302019-03-01T14:08:18+5:30
वैद्यकीय अहवालानुसार सरोदे ५० टक्के भाजले होते.
औरंगाबाद : त्रास देत असल्याच्या कारणावरून पती संजय सरोदे यांना पेटवून देत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कांचन ऊर्फ हिराबाई आणि दोन मेहुणे संजय आणि अशोक साठे यांना सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी गुरुवारी (दि. २८) प्रत्येकी दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात संजय रमेश सरोदे (३३, रा. पवननगर, एन-९, सिडको) यांनी तक्रार दिली होती की, ४ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त संजयची पत्नी कांचन हिने तिचा भाऊ संजय, अशोक, आई कांताबाई (५५) व वडील दामोधर मरिभा साठे (६५) यांना घरी बोलाविले होते. ते सर्व दुपारी ४ वाजेच्या सुमारास सरोदे यांच्या घरी आले. सरोदे इमरतीच्या तिसऱ्या मजल्यावर झोपलेले होते. त्यावेळी कांचन हिने सर्व आरोपींना सरोदे यांच्या खोलीत नेले. तेथे आरोपी अशोक याने सरोदे यांना लाथ मारून उठविले व शिवीगाळ करीत माझ्या बहिणीला त्रास का देतो, असे म्हणत सरोदे यांना अशोक व त्याच्या आई-वडिलांनी घट्ट पकडले. त्यानंतर कांचन हिने पती सरोदेच्या अंगावर रॉकेल ओतले. आम्ही तुला जाळून मारून टाकतो, असे म्हणत संजय साठे याने सरोदे यांना आग लावली.
सरोदे यांनी आरडा-ओरड केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. शेजाऱ्यांनी आग विझवून सरोदेंना सिडको पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सरोदे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार सरोदे ५० टक्के भाजले होते.
खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील तिघा आरोपींना भादंवि कलम ३०७ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला, तर कलम ३२३ अन्वये प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरी व कलम ५०४ अन्वये प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपी कांताबाई व दामोधर साठे या दोघांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.