कारभार सुधारा अन्यथा ‘इंक्रीमेंट’ थांबवू
By Admin | Published: May 30, 2017 12:24 AM2017-05-30T00:24:58+5:302017-05-30T00:27:27+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ हा प्रकार ‘लोकमत-नाईट वॉच’ मध्ये चव्हाट्यावर आणण्यात आला होता़ या वृत्तमालिकेची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कारभार सुधारण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या़ आता जिल्हा शल्यचिकित्सकांनीही उपजिल्हा रूग्णालयापासून ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र दिले असून, कामकाजात सुधारणा न झाल्यास ‘इंक्रीमेेंट’ थांबविण्याचा इशारा दिला आहे़
शहरातील जिल्हा रूग्णालयापासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्रच रात्रीच्यावेळी अपेक्षित रूग्णसेवा मिळत नसल्याचा प्रकार ‘लोकमत नाईट वॉच’मध्ये समोर आला होता़ बोटावर मोजण्याइतक्या रूग्णालयांचा अपवाद वगळता इतर सर्वत्र परिस्थिती बिकट होती़ कुठे डॉक्टर गायब, कुठे कर्मचाऱ्यांचा अपवाद तर कुठे रूग्णवाहिकेचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा फटका रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले़ ‘लोकमत’ने या सर्व रूग्णालयांची रात्रीच्यावेळी पाहणी करून वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्त मालिकेची दखल घेऊन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्याच्या सूचना देत रूग्णांना चांगल्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानंतर आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनीही उपजिल्हा रूग्णालय ते ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र काढले आहे़
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत़ खासगी प्रॅक्टीस करतात़ अनेक ठिकाणी विजेची सोय नसून, रूग्ण स्थलांतराचे प्रमाण वाढल्याचे नमूद करीत त्रुटींची पूर्तता करावी, चुका होऊ नयेत, खासगी प्रॅक्टीस करू नये अशा सक्त सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत़ सूचनांची दखल घेऊन कारभार सुधारला नाही तर आपली एक इंक्रीमेंट थांबविण्यात येईल, असा इशाराही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला आहे़ जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्राद्वारे इशारा दिला असला तरी याची अंमलबजावणी कितपत होणार ? जिल्हा रूग्णालयाचा कारभार खरेच सुधारणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे़