कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीला येरवडा कारागृहात हलविले; हर्सूलमध्ये समर्थक वाढल्याने खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:02 PM2018-09-11T19:02:05+5:302018-09-11T19:03:14+5:30
कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी आणि त्याच्या एका साथीदाराला हर्सूल कारागृह प्रशासनाने नुकतेच येरवडा कारागृहात हलविले.
औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी आणि शेख नासेर यांच्या खूनप्रकरणी न्यायालयाने नुकतीच दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी आणि त्याच्या एका साथीदाराला हर्सूल कारागृह प्रशासनाने नुकतेच येरवडा कारागृहात हलविले. कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती मिळाल्याने त्याला येथून हलविण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांवर गोळीबार करून इम्रान मेहदीला पळवून नेण्याच्या कटाचा गुन्हे शाखेने २७ आॅगस्ट रोजी पर्दाफाश केला. याप्रकरणी ११ जणांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींकडून दोन पिस्टल आणि १८ काडतुसे जप्त केली होती. २०१२ पासून हर्सूल कारागृहात असलेल्या मेहदीने मोठ्या संख्येने त्याचे समर्थक गोळा केले होते. अनेक आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी त्याने मदत केली होती. त्या बदल्यात त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडून नेण्याच्या कटात आरोपी सहभागी झाले होते.
दोन खून क रणाऱ्या विजय चौधरी यालाही त्याने मुस्लिम धर्माप्रमाणे कारागृहात प्रार्थना करण्याचे शिकविले आणि त्याचे अफताब असे नामांतर केले होते. अफताबही पिस्टल घेऊन मेहदीला पळविण्यासाठी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून औरंगाबादेत आला होता. त्याच्या अन्य साथीदारांनी मध्यप्रदेशातून शार्पशूटरची टोळी आणली होती.
मात्र याचा सुगावा पोलिसांना लागल्याने मेहदीला पळविण्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर सलीम कुरेशीच्या खूनप्रकरणी न्यायालयाने मेहदीसह आठ जणांना जन्मठेप आणि दंड ठोठावला तर शेख नासेरच्या खूनप्रकरणी मेहदी आणि अन्य एकाला जन्मठेप झाली. दुहेरी जन्मठेप झाल्यामुळे त्यांना आता कारागृहाबाहेर पडता येणार नाही. एकाच ठिकाणी आठ पक्के कैदी एकत्र राहिल्यास ते कारागृहात गदारोळ करू शकतात, ही बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने मेहदीसह अन्य एक जणाला पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.
कारागृह अधिकारी-कर्मचारी हिटलिस्टवर
कारागृहात असताना त्याला मनमानी करू न देणारे, तसेच नियमानुसार काम करणाऱ्या हर्सूल कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचारी मेहदीच्या हिटलिस्टवर होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाला मिळाली. त्यामुळे त्याला येथे ठेवणे धोक्याचे असल्याने त्याची रवानगी येरवड्यात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.