नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:38 PM2018-11-28T18:38:59+5:302018-11-28T18:42:07+5:30

लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्वाचा धोका असल्याने मुलांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे.

Impurative rheumatism opposes parents' gowar-rubella vaccination | नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध

नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देलसीकरण मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठी लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे.

औरंगाबाद : गोवर, रुबेला लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्वाचा धोका असल्याने मुलांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे. या अफवेमुळे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी गणेश कॉलनीतील मनपाच्या उर्दू शाळेत काही पालकांनी लसीकरणाला विरोध केला. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर काही पालकांनी होकार दिला. मात्र, काही पालक लसीकरण न करण्याच्या मुद्यावर ठाम राहिले.

जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील प्रत्येक मुला-मुलींना गोवर, रुबेला लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. गेली दोन महिने लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागाने विविध माध्यमांतून जनजागृती केली; परंतु अद्यापही काही प्रमाणात पालकांमध्ये गैरसमज असल्याचा प्रत्यय लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी आला. शहरातील गणेश कॉलनी येथील मनपाच्या उर्दू शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार होते; परंतु काही पालकांनी मुलांना लसीकरण करण्यास विरोध केला. ही बाब कळताच मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. लसीकरणाला विरोध करण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा पालकांनी सांगितलेले कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला.

लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्व येईल, अशी अफवा एका व्हिडिओद्वारे पसविण्यात येत आहे. या व्हिडिओमुळेच पालकांनी विरोध केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी डॉ. सय्यद मुजीब यांनी पालकांची समजूत काढली. लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच व्हिडिओतील बाबी चुकीच्या असल्याचे सांगितले. त्यामुळे लसीकरणाला काही पालकांनी होकार दिला. शाळेतील ४९ पैकी २० विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले. उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण आगामी दिवसांत होईल, असे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

३९ शाळांमध्ये ५ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण
शहरातील ३९ शाळांमध्ये ५ हजार ५९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तसेच ओपीडीत ६३४ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

लसीकरण मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठी
गणेश कॉलनी येथील मनपाच्या शाळेत गोवर-रुबेला लस देण्यास पालकांनी विरोध केला होता. लसीकरणातून नपुंसकत्व येईल, अशी अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे; परंतु ही अफवा असल्याचे पालकांना समजावून सांगण्यात आले. लसीकरण हे मुलांना आजारातून मुक्त करण्यासाठी आणि समाजातून हे आजार कायमस्वरूपी नाहीसे करण्यासाठी आहे. ही सर्व बाब सांगण्यात आल्यानंतर लसीकरणास होकार देण्यात आला. काही मुलांचे लसीकरण बाकी आहे. तेही होईल.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: Impurative rheumatism opposes parents' gowar-rubella vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.