जलील फडणवीसांच्या इशाऱ्यावर पक्ष चालवतात, 'वंचित' सोबतची युतीही तोडली: गफार कादरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:50 AM2024-10-23T11:50:09+5:302024-10-23T11:51:50+5:30
फडणवीसांच्या इशाऱ्यावर जलील एमआयएम चालवतात; पक्ष सोडताना कादरी यांनी डागली तोफ
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर अनेक आरोप केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर जलील पक्ष चालवतात, त्यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्यापेक्षा नागपुरात फडणवीस यांच्या विरोधात लढून दाखवावे. वंचित बहुजन आघाडीसोबतची युतीही त्यांनीच तोडल्याचा आरोप केला.
मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत कादरी यांनी सांगितले की, माझा राजीनामा ई-मेल, व्हॅट्सॲपच्या माध्यमाने पाठवून दिला. पक्षप्रमुखांकडे माझ्याविरोधात जलील यांनी एवढे कान भरले की, ते एक मिनिटही माझ्याशी बोलायला तयार नाहीत. माझ्या विरोधात कुटील डाव रचले. मी पक्ष सोडल्यानंतर राज्यातील अनेक पदाधिकारी राजीनामे देतील, असा दावा त्यांनी केला. आजपर्यंत जलील यांनीच पक्षाला कमकुवत केले. २०१९मध्ये राज्यात अनेक जागांवर समाजवादी पक्षासोबत एमआयएमने युती केली. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मोठ्या मुस्लीम नेत्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून त्यांना पाडण्याचे कामही त्यांचीच केले. आरेफ नसीम खान यांचे उदाहरण कादरी यांनी दिले.
वंचितसोबत युती ताेडली
सन २०१९मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या दीड लाख मतांमुळे जलील निवडून आले. त्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना विधानसभेच्या तोंडावर एक पत्र पाठविले. त्या पत्राची सुरुवात ‘डिअर प्रकाश आंबेडकर’ अशी होती. हे पत्र पाहून ते थक्क झाले. पत्रात एमआयएमने तब्बल १२२ जागांची मागणी केली होती. त्यामुळे युती तुटली, असा आरोप कादरी यांनी केला.
काँग्रेसकडून उमेदवारीचे प्रयत्न
पूर्व विधानसभा मतदारसंघातूनच मी यंदा निवडणूक लढविणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली. त्यासाठी काँग्रेस पक्षासोबत बोलणी सुरू आहेत. मी दिल्लीला जाऊन आलो. दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावाही त्यांनी केला.