'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:33 PM2022-11-08T16:33:17+5:302022-11-08T17:01:15+5:30
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत.
औरंगाबाद: राज्याच्या राजकारणात गेल्या ४ महिन्यांपासून औरंगाबाद हे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातूनच त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळेच, औरंगाबादेतील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळात संधीही देण्यात आली. त्यापैकी, अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. त्यानंतर, त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली. या भेटीत जलील यांनी श्रीकांत शिंदे अन् मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. दुसरीकडे कुठेतरी कॉर्नर सभा सुरु आहे, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. श्रीकांत शिंदे यांनी औरंगाबाद दौऱ्यात एमआयएमचे नेते आणि त्यांचे लोकसभेतील सहकारी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी, उपस्थित लोकांना उद्देशून छोटेखानी भाषणही केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या जलील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भरभरुन कौतुक केलं.
जलील यांच्यावतीने क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी, एकदा का शब्द दिला की, तो पाळणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे होय, असे जलील यांनी म्हटले. तर, आम्ही दोघेही वेगळ्या पक्षाचे नेते आहोत, वेगळ्या विचारधारेचे लोकं आहोत. पण, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. आम्ही दोघेही मित्र आहोत. लोकसभेत आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळेच, त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका
श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या दौऱ्याचीही खिल्ली उडविली. सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.