‘एमआयएम दंगलीच्या तयारीत’; खैरेंच्या आरोपावर जलील यांचा प्रतिहल्ला,‘फिजूल लोक...’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:51 PM2024-05-02T16:51:59+5:302024-05-02T16:54:02+5:30
चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील आमने- सामने
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केल्यानेकही टवाळखोरांनी संबंधिताच्या दालनावर दगडफेक केली होती. त्यावरून आरोप, प्रत्यारोप होत आहेत. यावरून चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील आमने- सामने आले आहेत.
‘एमआयएम’ संपल्यास शहरात शांतता- चंद्रकांत खैरे
‘एमआयएम’ शहरात दंगली करण्याच्या तयारीत आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला. शहरात सोमवारी एका भागात दुकानावर दगडफेकीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर बोलताना खैरेंनी हा आरोप केला. शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन ठेवून मी काम करीत आहे. शहरात काही होऊ नये, यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी ‘एमआयएम’ला संपवून टाकायचे आणि शहर शांत ठेवायचे, ही माझी भूमिका आहे, असे खैरे म्हणाले.
फिजूल लोग, फिजूल सवाल : इम्तियाज जलील
लेबर कॉलनी येथील घटनेप्रकरणी एमआयएम शहरात दंगल घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विरोधी उमेदवाराकडून करण्यात येतोय, या प्रश्नावर उमेदवार तथा खा. इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, विरोधकांकडून अनेक आरोप होतील. तर मी प्रत्येकाचे उत्तर देत बसणार आहे का? राहिला प्रश्न खैरे यांच्या आरोपाचा; तर मी एवढेच म्हणेन ‘फिजूल लोग, फिजूल सवालों का मैं जवाब नहीं देता.’ हवे तर खैरे यांनी पोलिस ठाण्यासमोर धरणे देत बसावे. माझे काहीही म्हणणे नाही.