Imtiyaz Jaleel: 'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 04:40 PM2022-03-27T16:40:16+5:302022-03-27T16:40:21+5:30
Imtiyaz Jaleel: 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता.
औरंगाबाद: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ''2019 मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मला खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abul Sattar) यांचा मोठा वाटा होता'', असा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे.
अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, ''आज मी लोकसभेत आहे, ते अब्दुल सत्तार यांच्यामुळे. मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा आहे,'' असा गौप्यस्फोट जलील यांनी केला आहे. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते.
चंद्रकांत खैरेंचा पराभव
इम्तियाज जलील 2019च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून निवडून आले आहेत. एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने निवडणूक सोबत लढली होती. इम्तियाज जलील यांनी तत्कालीन खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यावेळेस अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. आता इम्तियाज जलील यांच्या गौप्यस्फोटामुळे नवीन चर्चांना तोंड फुटले आहे.