जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले
By सुमेध उघडे | Published: April 17, 2024 03:29 PM2024-04-17T15:29:33+5:302024-04-17T15:38:39+5:30
जलील, खैरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तरी महायुतीच्या उमेदवार निश्चित झालेला नाही.
छत्रपती संभाजीनगर: महायुतीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला? उमेदवारी कोणाला ? हा घोळ अद्याप मिटला नाही. यामुळे विरोधी पक्षाने जोरदार टीकेची झोड उठवली असताना रामनवमीचा मुहूर्त साधून आज सकाळी महायुतीच्या नेत्यांनी शहरातील प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यासह महायुतीचे जिल्हाभरातील आमदार, नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
राज्याचे लक्ष असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात सर्वात प्रथम एमआयएमने खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीत मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेला, पण उमेदवारी जाहीर होण्यात त्यांनीही वेळ घेतला. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली. दरम्यान, खैरे यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. यातच मानापमान नाट्य घडत दानवे- खैरे वाद पेटला. पण अखेर खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. दुसरीकडे मतदारसंघ आमचाच असा दावा शिंदेसेना आणि भाजपा दोघांनी केल्याने महायुतीत वातावरण तापले. आता जागा शिंदेसेनेला सुटली असल्याची माहिती आहे. मात्र, उमेदवार कोण ? याचे उत्तर महायुतीत कोणीच देऊ शकत नाही.
जलील, खैरे प्रचारात; महायुती उमेदवाराच्या शोधात
खासदार जलील यांच्या प्रचारार्थ एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. तर खैरे यांनी देखील ग्रामीण भागात संपर्क वाढवून प्रचारात आघाडी घेतली आहे. यासोबतच वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी देखील ईद आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहच वाढवली आहे. उमेदवारी ठरत नसल्याने महायुतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच किमान प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजानाने तरी महायुतीचे सर्व नेते एकत्र आले. उमेदवाराच्या घोळात स्तंभपूजन उरकून आता आम्ही देखील कंबर कसली आहे, फक्त उमेदवार जाहीर होण्याचे बाकी असल्याचा स्वर महायुतीच्या नेत्यांच्या भाषणातून दिसून आला.
महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम
औरंगाबादची जागा शिंदेसेनेला देण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे स्थानिक इच्छुक बॅकफुटवर गेले आहेत. तर दुसरीकडे शिंदेसेनाच येथील जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून इच्छुक उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.