१९९६ साली मुलायमसिंग यांचा औरंगाबादेत होता सहा दिवस मुक्काम
By स. सो. खंडाळकर | Published: October 11, 2022 06:17 PM2022-10-11T18:17:05+5:302022-10-11T18:31:13+5:30
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते.
औरंगाबाद : समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांचा १९९६ साली सहा दिवस औरंगाबादेत मुक्काम होता. त्यावेळी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. त्यानंतर ते कधी औरंगाबादला आले नाहीत.
त्यावेळी ते देशाचे संरक्षणमंत्री होते व समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मुलायमसिंग यादव यांचे नाव नेहमीच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहत आले; पण ती संधी त्यांना मिळाली नाही. उत्तरप्रदेशसारख्या राज्याचे ते तीनवेळा मुख्यमंत्री राहिले. आठवेळा ते आमदार व ७ वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. उत्तर प्रदेशात अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांच्यासाठी काही प्रचारसभा घेतल्या होत्या.
आमदार, खासदार, मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्री
समाजवादाचे प्रणेते राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. ते १० वेळा आमदार आणि सातवेळा खासदार झाले. ते १९८९, १९९१, १९९३ आणि २००३मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९६ ते ९८ दरम्यान त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषविले. एकेकाळी ते देशाच्या पंतप्रधानपदाचेही दावेदार मानले जात होते.
सैफई येथील मेला मैदानावर अंत्यसंस्कार पार पडले
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव आज पंचत्त्वात विलीन झाले. माजी संरक्षण मंत्री आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यांच्यावर इटावा येथील सैफई येथील मेला मैदानावर अंत्यसंस्कार पार पडले. मुलायम यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी त्यांना मुखाग्नि दिला.