मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

By विकास राऊत | Published: August 29, 2023 12:13 PM2023-08-29T12:13:31+5:302023-08-29T12:14:08+5:30

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी

In 2000 villages of Marathwada, rainfall breaks, only 35 percent water in dams | मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५३४ मंडळांपैकी तब्बल १०३ मंडळांमध्ये पावसाने २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला. एका मंडळात सरासरी १८ ते २० गावांचा समावेश असून, २ हजार गावांतील खरीप हंगामातील पिके संकटात आली. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही, तर पेरण्यांसाठी केलेली गुंतवणूक निघेल एवढेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही.

एल निनोचा परिणाम विभागातील पर्जन्यमानावर झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४८.४३ टक्के पाऊस झाला. ८५ पैकी ५२ दिवस कोरडेच तर ३३ दिवस पाऊस झाला. ३८ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्केच पाऊस झाला. २०६ महसूल मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. एकूण ५३४ महसूल मंडळांपैकी १०३ मंडळांमध्ये २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड पावसाने दिला. यामध्ये सर्वाधिक ३१ मंडळांत येणारी ६२० गावे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांतील ५४० तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ मंडळांतील ३०० गावे, जालना जिल्ह्यातील ८ मंडळांतील १६० गावे आणि बीड जिल्ह्यातील ११ मंडळांतील २२० गावांत २१ दिवसांपासून खंड आहे. नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांवर दुष्काळी संकट आहे. ४८.५७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४८.२३ लाख हेक्टरवर या वर्षी पेरणी झाली. यात सोयाबीन ५३ टक्के, कापूस २८ टक्के, तूर ७ टक्के, मका ५, उडीद २, मूग २ तर बाजरी दीड टक्के क्षेत्रावर पेरली.

अटीचा अडथळा
कमी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के रक्कम विमा संरक्षित रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी पावसाच्या २१ दिवस खंडाची अट आहे. ३७ तालुक्यांतील १०३ महसूल मंडळे येतात. काही मंडळांत २० दिवस पाऊस पडला नाही आणि एक दिवस केवळ पावसाची रिमझिम होताच शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. शासनाने १ रुपयांत पीकविमा योजना आणल्याने यंदा मराठवाड्यातील ७० लाख २७ हजार ९३५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी
मराठवाड्यातील मोठ्या जलप्रकल्पात ४२ टक्के, मध्यम प्रकल्पात २२, लघू प्रकल्पात २१ असा साधारणत: ३५ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांतील काही भागांत एक ते दोन मीटरपर्यंत भूजलपातळी खाली आली आहे. ३२ नगरपालिका क्षेत्रांमध्ये सरासरी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर या वर्षी ८४ टँकर १०० हून अधिक गावांत सुरू आहेत.

तीन महिने पुरेल एवढाच चारा
विभागात दररोज २५ हजार मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत २१ लाख ७७ हजार मे. टन चारा उपलब्ध असल्याचा आकडा आहे. हा चारा ८५ दिवस पुरेल. विभागात ४८ लाख ६१ हजार जनावरे आहेत.

Web Title: In 2000 villages of Marathwada, rainfall breaks, only 35 percent water in dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.