दारू पार्टीत बिनसले अन् दोघांनी मित्राचे छाटले मुंडके; मृताची गाडी, पैसा घेऊन झाले होते पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:10 PM2023-01-20T19:10:55+5:302023-01-20T19:11:21+5:30
मुंडके धडा वेगळे करून जाळण्याचा झाला होता प्रयत्न; खुनाचे रहस्य अखेर उलगडले
- शेख मेहमूद
वाळूज महानगर (औरंगाबाद) : वाळूज उद्योगनगरीत मुंडके छाटुन अजय व्यंकटराव निलवर्न उर्फ देशमुख (२१,रा.मंगरुळ-पापट, ता.मानवत, जि.परभणी, ह.मु. रांजणगाव) या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. दारु व व्हाईटनरच्या नशेत मित्राचा खून करुन फरार झालेल्या दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी कल्याण ( जि.ठाणे ) येथून जेरबंद केले आहे.
याविषयी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत घटनेचा उलगडा कसा झाला याबाबत माहिती दिली. वाळूज उद्योगनगरीतील फतेजा फोर्जींग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात खोल खड्यात एका अनोळखी तरुणाचा मुंडके धडावेगळे करुन १४ डिसेंबरला निर्घुणपणे खून करण्यात आला होता. धडावेगळे शिर केलेल्या या तरुणाचा मृतदेह मिळून आल्यामुळे वाळूज उद्योगनगरीत चांगलीच खळबळ उडाली होती. त्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ५ पथके स्थापन करुन शोध घेतला.
दरम्यान, तरुण रांजणगावाचा असल्याचे समोर आले होते. अजय व्यंकटराव निलवर्न उर्फ देशमुख (२१) अशी मृताची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी खुन्याचा शोध अधिक तीव्र केला. तपासात मृत अजय यास दारु व व्हाईटनरचे व्यसन असल्याचे समजले. तसेच खुनाच्या घटनेनंतर अजयचे दोन मित्र परिसरातून गायब होते. दरम्यान, दोघे संशयित कल्याण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मृताच्या दूचाकीवरुनच मारेकरी कल्याणला पसार
खून केल्यानंतर दोन्ही आरोपी अजयची दुचाकी घेऊन फरार झाले होते. दोघेही अहमदनगरमार्गे मसा ( ता.कल्याण जि.ठाणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्री कल्याण येथून निखील भाऊसाहेब गरड (१९ रा.जळगाव, ता.पैठण, ह.मु.रांजणगाव) व प्रतिक सत्यवान शिंदे (२१, रा.हिवरे, ता.कोरगाव, जि.सातारा, ह.मु.रांजणगाव) यांना ताब्यात घेतले. निखील व प्रतिकला पोलिसी खाक्या दाखविताच अजयचा दगडाने गळा चिरुन खून केल्याची कबुली दिली.
नशेत केला मित्राचा घात
घटनेच्या दिवशी शनिवारी (दि.१४) दिवसभर अजय देशमुख, निखील गरड व प्रतिक शिंदे यांनी दारु पिऊन व्हाईटनरची नशा केली होती. नशेत अजयने शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या निखील व प्रतिक या दोघांनी त्याला दुचाकीवर बसवून सांयकाळी फतेजा फोर्जिंग कंपनीजवळील मोकळ्या मैदानात सुनसान ठिकाणी घेऊन गेले. रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास या दोघांनी नशेत असलेल्या अजय याचे डोके दगडाखाली ठेवत धारदार दगडाने त्याचे मुंडके धडावेगळे केले. अजयच्या खिशातील ६ हजार रुपये काढून घेत त्याच्याच दुचाकीतून पेट्रोल काढून मृतदेहाला आग लावली. त्यानंतर दुचाकी घेऊन तेथून पसार झाल्याचे पोलिसांना त्यांनी सांगितले.
पुरावा नसतांना पोलिसांनी केला उलगडा
विशेष म्हणजे, मृत आणि मारेकरी मोबाईल वापरत नव्हते. या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. कुठलाही पुरावा नसतांना पोलिसांनी अजय देशमुख याच्या खुनाचा उलगडा करीत मारेकरी निखील गरड व प्रतिक शिंदे यांना बेड्या ठोकल्या.
ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहा.आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे निरीक्षक संदीप गुरमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहा.निरीक्षक एम.आर.घुनावत, गौतम वावळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, राहुल निर्वळ, चेतन ओगले, सचिन पागोटे, राजेंद्र बांगर, अशोक इंगोले,प्रविण वाघ, पोना.बाबासाहेब काकडे, नवाब शेख, पोकॉ.अविनाश ढगे, बाळू लहरे, राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, हनुमंत ठोके, सुरेश कच्चे, सचिन नवरंगे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.