खळबळजनक ! ठाण्याच्या आवारातच पोलिस निरीक्षकावर हवालदाराचा चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:34 PM2022-06-21T22:34:48+5:302022-06-21T22:35:34+5:30
पीआय केंद्रे यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद: जिंसी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर पोलिस हवालदारानेच चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री 8. 30 वाजता जिंसी पोलिस ठाण्यात घडली. ठाण्याच्या आवारातच केंद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.
मुजाहेद शेख असे आरोपी हवालदारचे नाव आहे . त्याने दोन महिन्यांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती, असे कळते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या बदल्यात शेखची बदली बेगमपुरा पोलिस ठाण्यात झाली होती. यानंतर त्याने व्हीआरएस घेतल्याची माहिती आहे.
या हल्ल्याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हे मंगळवारी रात्री पोलिस ठाण्याच्या परिसरात आयोजित गौरव समारंभात होते. स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी कोविड काळात पीआय केंद्रे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल गौरव ठेवला होता. हा समारंभ संपत असतानाच आरोपी शेख तेथे आला आणि तुम्ही सर्व जण केंद्रे यांची खोटी प्रशंसा करीत आहात असे म्हणून त्यांना शिविगाळ करू लागला. पीआय केंद्रे यांनी त्याला शिविगाळ का करतो , तुझे म्हणणे काय आहे असे विचारले. त्यानंतर शेख याने थेट चाकू काढून त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. पहिला वार पोटावर ,दुसरा छातीवर केल्यानंतर तिसरा वार करीत असताना केंद्रे यांनी चाकू हातात पकडला.
दरम्यान, हल्ल्यात पीआय केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त निखिल गुप्ता , उपायुक्त दीपक गिरहे, आणि अन्य अधिकाऱ्यानी दवाखान्यात धाव घेतली. गंभीर जखमी पीआय केंद्रे यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.