'गार्बेज ट्रान्स्फर'ने दुर्गंधीच्या यातना; औरंगाबादमधील या रस्त्याने गेलात तर उलटीच होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 08:21 PM2022-09-24T20:21:03+5:302022-09-24T20:24:36+5:30
मनपाकडून वेळेवर काम होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्या लागत आहेत.
औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा संकलन ३५० रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येते. प्रत्येक रिक्षातील कचरा मोठ्या वाहनांमध्ये नेऊन टाकण्यात येतो. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी उघड्यावर ही प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना, वाहनधारकांना पादचाऱ्यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सिल्लेखाना, मिलकॉर्नर, सलीम अली सरोवर रोडने नागरिक पायी जात असतील तर त्यांना उलटी होऊ शकते. मनपा मागील चार वर्षांपासून बंदिस्त ट्रान्स्फर स्टेशन उभारत आहे, हे विशेष.
शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने २०१८ मध्ये मनपाला १४८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यानुसार चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. अंदाजपत्रकात सहा ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्याचे ठरले. त्यातील रमानगर, सलीम अली सरोवर येथील फक्त काम सुरू आहे. शिवाजीनगर येथील कामाला सुरुवातच झाली नाही. जे काम सुरू केले ते सुद्धा अत्यंत संथ गतीने आहे. आतापर्यंत एकही कचरा संकलन केंद्र उभारण्यात मनपाला यश आले नाही. विशेष बाब म्हणजे या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानंतरही मनपाकडून वेळेवर काम होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्या लागत आहेत.
सध्या मिलकॉर्नर, सिल्लेखाना, सलीम अली सरोवर, जकात नाका, एन-१२, चिकलठाणा, शिवाजीनगर, सिग्मा रुग्णालय, कांचनवाडी येथे उघड्यावर रिक्षातील कचरा मोठ्या वाहनांमध्ये जमा करण्यात येतो. ज्या ठिकाणी हा कचरा जमा करण्यात येतो, त्याठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटलेली असते. पादचारी, वाहनधारक, परिसरातील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत कचरा संकलनाचे काम सुरू असते. मात्र, दिवसभर या ठिकाणी दुर्गंधी असतेच. मिलकॉर्नर येथील मुख्य रस्त्यावर एखादा पादचारी जात असेल तर त्याला दुर्गंधीमुळे उलट्या आल्याशिवाय राहणार नाहीत.
जागा शोधणे सुरू
ट्रान्स्फर स्टेशन उभारण्यासाठी जागा शोधावी, असे वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जागा मिळाल्यावर बंदिस्त स्टेशन उभारले जातील. रस्त्यावर जिथे कचरा संकलन सुरू आहे, तेथे दुर्गंधी येऊ नये म्हणून पावडर टाकण्यात येईल.
- सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.