औरंगाबादेत राष्ट्रवादी युवककडून अब्दुल सत्तारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, घरावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:38 PM2022-11-07T18:38:45+5:302022-11-07T18:40:17+5:30
औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत क्रांती चौक येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून औरंगाबादेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. जाहीर माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे क्रांती चौकात दहन केले. तसेच काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या हिमायतबाग येथील घरावर दगडफेक केली.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. दरम्यान, औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत क्रांती चौक येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन ही करण्यात आले. तसेच काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या हिमायतबाग येथील निवासस्थानावर दगडफेक केली.
सत्तारांचे आता सहन करणार नाही
सिल्लोड येथील नागरिकांनी अब्दुल सत्तार यांचे खूप लाड केले. पण आता सहन होत नाही. मागेही त्यांनी जनतेला कुत्रा संबोधले होते. आता आपल्या बेताल वक्तव्याबाबत आधी खा. सुप्रिया सुळे यांची माफी मागावी. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर ते औरंगाबादचे आहेत आणि आम्हीही येथेच आहोत असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते निलेश राउत यांनी दिला.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.