भांडण बायकोसोबत; पतीने दुचाकी चोरून काढला राग
By राम शिनगारे | Published: January 5, 2023 06:56 PM2023-01-05T18:56:35+5:302023-01-05T18:57:02+5:30
गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील आरोपीस ठाेकल्या बेड्या : तीन लाखांच्या सहा दुचाकी केल्या हस्तगत
औरंगाबाद : बायकोसोबत भांडण झाल्यामुळे घर सोडल्यानंतर काय करावे या विवंचनेत पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चक्क दुचाकी चोरींचा सपाटाच लावला. या दुचाकी चोरास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून ३ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
प्रदीप बाबुराव जाधव (२४, रा. गल्ली क्र ५, संजयनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील दुचाकी चोराचे नाव आहे. प्रदीप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी विमानतळाच्या समोरील संघर्षनगर येथील मैदानावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून प्रदीपला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ताब्यातील दुचाकी मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. हि कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, अजहर कुरेशी, सहायक फौजदार शेख हबीब, जमादार विजय निकम, दत्तात्रय गडेकर, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, संजय मुळे, तात्याराव शिनगारे, संदीप जाधव नितीन देशमुख यांनी केली.
१५ दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण
आरोपी प्रदीप जाधव हा पुर्वीपासून चोरीसह इतर प्रकारचे गुन्हे करीत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याने चोऱ्या करणे बंद केले होते. १५ दिवसांपूर्वी घरात बायकोसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यातुन त्याने घर सोडले. घर सोडल्यानंतर काय करावे या विवंचनेत असतानाच त्याने दुचाकी चाेरण्यास सुरूवात केली. त्यातुन आलेल्या पैशातून तो मौजमज्जा करीत असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना चौकशीत दिली.