विभागीय आयुक्तालयात प्रभारीराज; नवीन अधिकारी मिळेनात
By विकास राऊत | Published: October 17, 2023 03:28 PM2023-10-17T15:28:49+5:302023-10-17T15:29:04+5:30
महसूल उपायुक्तांसह इतर सात पदे रिक्त
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख असलेल्या आयुक्तालयात सध्या प्रभारीराज आले आहे. उपायुक्त दर्जाची सात पदे सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे इतर उपायुक्तांकडे अनेक विभागांचा पदभार सोपविला आहे. अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने अधिकारी वैतागले आहेत. रिक्त पदे भरण्याचा शासन केव्हा निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांच्या महसूल विभागाचा कारभार विभागीय आयुक्त कार्यालयातून चालत असून सात पदे बदली, पदोन्नती आणि सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत.शासनाने या रिक्त पदांवर इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. यामध्ये अपर विभागीय आयुक्त क्रमांक १, उपायुक्त-महसूल, उपायुक्त-पुरवठा, उपायुक्त-पुनर्वसन, उपायुक्त-विकास, उपायुक्त नियोजन आणि सहायक संचालक ताळमेळ ही पदे रिक्त आहेत.ही पदे रिक्त असल्याने त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांना स्वत:च्या विभागासह इतर दोन विभागांचा कारभार सांभाळावा लागत आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी, मराठा आरक्षण समिती, शहर पाणी पुरवठा योजना, जमीन सुनावण्या आणि येणाऱ्या काळात दुष्काळ उपाययोजनांची कामे आहेत.शासनाच्या वारंवार आढावा बैठकांचे सत्र सुरू असते. त्यामुळे कामाचा ताण वाढल्याने अधिकारी वैतागून गेले आहेत.
दोन वेळा शासनाला पत्र
रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, याबाबत विभागीय आयुक्तांनी दोन वेळा शासनाला पत्र पाठविले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर जागा भरण्यात येतील, असे वाटत होते. बैठक होऊन महिना होत आहे. परंतु रिक्त जागा भरण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.