चार वर्षांत ४ विद्यापीठांचे प्रभारी; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडे संत गाडगेबाबा विद्यापीठाची सूत्रे
By योगेश पायघन | Published: February 4, 2023 06:59 PM2023-02-04T18:59:15+5:302023-02-04T19:01:40+5:30
संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे हे कुलगुरू पद रिक्त झाले होते.
औरंगाबाद :अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज स्विकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासह आतापर्यंत पाच विद्यापीठात कुलगुरुपद सांभाळण्याचा सन्मान डॉ. येवले यांना मिळाला आहे.
संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे हे कुलगुरू पद रिक्त झाले होते. या पदावर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी त्यांची नियुक्ती केली. प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी डॉ. प्रमोद येवले यांचा सत्कार केला. डाॅ. येवले म्हणाले, हा आनंदाचा क्षण नाही. परंतू डॉ. मालखेडे यांचे अपूर्ण काम आता पुढे न्यायचे आहे. असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नव्या शैक्षणिक धोरणाची माहीती महाविद्यालये, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहीजे. आर्थिक बाबतीत स्वायत्त संस्था स्वत:च्या पायावर उभी रहावी. त्यादृष्टीने आपल्या विद्यापीठाचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करू. तसेच कर्मचायांनी संप न करता त्यातून मार्ग काढावा. त्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यांशी बोलू असेही त्यांनी स्पष्ठ केले.
विद्यापीठ विकास अन् प्रगतीस प्राधान्य
विद्यापीठात शैक्षणिक पावित्र्य, गुणवत्ता राहिली पाहिजे. गुणवत्ता वाढीचा प्रयत्न विद्यापीठासोबत महाविद्यालयांची सुद्धा जबाबदारी आहे. विद्यापीठ विकास अन् प्रगतिसाठी समाजाचा विश्वास आवश्यक आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढवतांना सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. विविध प्राधिकारणांचे गठण, नॉमिनेशन, दीक्षांत समारंभासह अनेक महत्वाची कामे करतांना परीक्षेचे काम वेळेत पूर्ण करावयाचे आहेत.
आतापर्यंत चार विद्यापीठांचे कुलगुरू पद संभाळले
डॉ. येवले यांनी यापुर्वी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, रामटेक येथील कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ जुलै २०१९ पासून कुलगुरुपदी कार्यरत आहेत. फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची अध्यक्षपद ही त्यांनी भुषविले असून महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.