कोट्यवधींच्या जमिनीवर भूमाफियाचा कब्जा; ताबा सोडण्यासाठी केली दीड कोटी रुपयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:31 PM2023-03-03T19:31:56+5:302023-03-03T19:32:22+5:30

पोलिस आयुक्तांच्या आदेशाने संबंधिताच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, मुख्य आरोपीवर यापूर्वी १२ गुन्हे

In Chatrapati Sanbhajinagar Grabbing land worth crores by land mafia; Demand of Rs.1.5 Crore for release of possession | कोट्यवधींच्या जमिनीवर भूमाफियाचा कब्जा; ताबा सोडण्यासाठी केली दीड कोटी रुपयांची मागणी

कोट्यवधींच्या जमिनीवर भूमाफियाचा कब्जा; ताबा सोडण्यासाठी केली दीड कोटी रुपयांची मागणी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : भूमाफियाने मिटमिटा शिवारात राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधी रुपयांच्या २ हेक्टर ६१ आर म्हणजेच ६ एकर २१ गुंठे जमिनीवर दीडशे ते दोनशे लोकांच्या मदतीने अनधिकृतपणे ताबा मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने प्राथमिक तपास केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह ९ जणांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली.

आरोपींमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी भूमाफिया अंबादास आसाराम म्हस्के (रा. पडेगाव), किसन कानसे, इलियास पटेल, खंडू म्हस्के, नंदकुमार रावसाहेब म्हस्के, चंद्रकलाबाई आसाराम जाधव, जनाबाई वामनराव पादर, शोभाबाई कचरू प्रधान यांच्यासह इतरांचा समावेश आहे. नसीर रशीद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी अंबादास म्हस्के याचे वडील आसाराम म्हस्के यांनी मिटमिटा शिवारातील गट नंबर १४५ मधील २ हेक्टर ६१ गुंठे जमीन १९९०मध्ये सात व्यक्तींना विकली. २००४मध्ये या सर्व जमिनीचा जीपीए (मुखत्यारनामा) खरेदीदारांनी तरविंदरसिंग धिल्लन यांना करून दिला. धिल्लन यांनी २००६मध्ये ही जमीन नसीर पठाण यांच्या जानकीराम, महेश थट्टेकर यांच्या बलराम, सतीश धर्मराज लिंभारे यांच्या जयराम, बिपीन सुभाष राठी यांच्या शिवराम, पुनीत विजय मालानी यांच्या साईराम, सुनील एकनाथ लोहारकर यांच्या सीताराम, रमेश लिंभाेरे यांच्या रघुराम आणि सचिन रतनलाल भट्टड चेअरमन असलेल्या परशुराम सहकारी गृहनिर्माण संस्थांना विकली. या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. त्यानंतर खरेदी केलेल्या संस्थांच्या नावाने या जमिनीची मालकी सातबारात नोंदविण्यात आली. या जमिनीवर एका संस्थेचे चेअरमन रमेश लिंभोरे यांचा मुलगा व पत्नीने छोटेखानी हॉटेलही सुरू केले होते. २७ जानेवारी रोजी सकाळी या जमिनीवर १०० ते १५० पुरुष, महिलांनी येऊन जमिनीवर मालकीचा लावलेला बोर्ड हटवला. त्याशिवाय हॉटेलची तोडफोड केली. लिंभोरे यांना हाकलून दिले.

हा प्रकार जमीन मालकांना समजल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांनाही आरोपी अंबादास म्हस्के याने जमिनीचा मूळ मालक आपले वडील आसाराम असून, त्यांचा वारस म्हणून माझा ताबा असल्याचे सांगितले. तेव्हा नासिर पठाण यांच्यासह महेश थट्टेकर यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत हाकलून दिले. त्यानंतर आठ मालकांनी एकत्र येत २७ जानेवारी रोजी नासिर पठाण व महेश थट्टेकर यांना जीपीए करून देत त्यांच्याकडे सर्वाधिकार सोपवले. या दोघांनी अंबादाससोबत संवाद साधला असता, त्याने दीड कोटी रोख किंवा एक एकर जमीन दिल्यास आपण हा ताबा सोडू, असे स्पष्ट केले. त्यामुळे नासिर पठाण यांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेत तक्रार नोंदवली. त्याठिकाणी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक काशिनाथ महाडुंळे यांनी तक्रारीची सखोल चौकशी केली. तेव्हा अंबादास म्हस्के याने जबरदस्तीने जमिनीवर ताबा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशाने संबंधिताच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक कैलाश देशमाने करीत आहेत.

मुख्य आरोपीवर १२ गुन्हे
अंबादास म्हस्के याच्यावर जमिनी बळकावण्यासह इतर प्रकारचे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार किसन कानसे याच्यावरसुद्धा तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली. त्याने जमिनीवर ताबा करताच त्याठिकाणी स्वत:च्या नावाने वीज कनेक्शन घेतले. कूपनलिका खोदून तत्काळ सर्व बाजूंनी बांधकामही सुरू केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: In Chatrapati Sanbhajinagar Grabbing land worth crores by land mafia; Demand of Rs.1.5 Crore for release of possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.