रेल्वेस्टेशनच्या पुनर्विकासात झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होण्याची भीती
By संतोष हिरेमठ | Published: August 10, 2023 03:23 PM2023-08-10T15:23:53+5:302023-08-10T15:25:56+5:30
जैवविविधतेला पोषक जागा जपून स्टेशनचे काम करण्याची पर्यावरणप्रेमींची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करून रुपडे बदलण्यात येणार आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातून परिसरातील जैवविविधेतेला पोषक असलेल्या जागांवर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागा जपून स्टेशनचे काम करण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा डिसेंबर २०२५ पर्यंत पुनर्विकास करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे विविध टप्प्यांत केले जाणार आहे. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या परिसरातून या कामाला सुरुवात केली जाणार आहे आणि जुन्या रेल्वेस्टेशनच्या परिसरातच सर्वाधिक झाडे आहेत. या झाडांवर बगळ्यांपासून विविध पक्ष्यांची घरटी आहेत.
किती झाडांवर संकट?
रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या परिसरात १५ पेक्षा अधिक झाडे आहेत. यातील काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील म्हणाले, स्टेशन परिसरातील काही झाडांच्या फांद्या छाटणीची परवानगी मागण्यात आलेली आहे. स्टेशन परिसरातील झाडांसंदर्भात अधिक माहिती घेतली जाईल.
सध्या इमारती किती आणि नवी इमारत किती क्षेत्रात?
- सध्याच्या ५ हजार ६७५ चौ.मी.च्या तुलनेत प्रस्तावित स्थानक इमारतीचे क्षेत्र २७ हजार ७३ चौ.मी राहणार आहे. उत्तर स्थानक इमारत २२ हजार १८० स्वेअर मीटर आणि दक्षिण स्थानक इमारत ४ हजार ८९३ स्वेअर मीटरमध्ये राहणार आहे. टर्मिनल बिल्डिंग आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा ७२ मीटर डबल लेव्हल एअर कॉन्कोर्स असेल. तर रूफ प्लाझा (७२ बाय ६६ मीटर) आणि छताचे आवरण क्षेत्र २८ हजार ८०० चौ.मी. राहणार आहे.
‘डीआरएम’ म्हणाल्या...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, रेल्वेस्टेशनचे काम करताना झाडे कापण्याची वेळ येणार नाही. अशावेळी झाडे इतर जागेत पुनर्रोपित केली जातात. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरील झाडांसंदर्भात नेमके काय केले जात आहे, याची माहिती घेतली जाईल.
- औरंगाबाद उद्यान अधीक्षक
झाडे आणि पक्षी दोन्ही वाचावी
रेल्वेस्टेशन मोठे बनविले जात आहे, हे महत्त्वाचे आहे. मात्र, स्टेशनचे काम करताना झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. त्यावर पक्ष्यांची घरटी आहेत. स्टेशन परिसर जैवविविधतेचे पोषक वातावरण आहे. झाडे वाचवूनच स्टेशनचे काम केले पाहिजे.
- रवी चौधरी, अध्यक्ष, प्रयास यूथ फाउंडेशन