दरमहा लाखो डायपर, नॅपकिनची विक्री; फेकतात कुठे? जागा दिसेल तिथे गुपचुप टाकून पोबारा

By मुजीब देवणीकर | Published: June 24, 2023 06:51 PM2023-06-24T18:51:26+5:302023-06-24T18:52:44+5:30

महापालिकेच्या घनकचरा विभागाची डोकेदुखी; पर्यावरण, आरोग्यासाठी घातक असलेल्या या कचऱ्याकडे प्रशासनाचेही साफ दुर्लक्ष होत आहे.

In Chhatrapari Sambhajinagar Sales of millions of baby diapers, napkins per month; Where do you throw? throwing wherever see a place | दरमहा लाखो डायपर, नॅपकिनची विक्री; फेकतात कुठे? जागा दिसेल तिथे गुपचुप टाकून पोबारा

दरमहा लाखो डायपर, नॅपकिनची विक्री; फेकतात कुठे? जागा दिसेल तिथे गुपचुप टाकून पोबारा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांच्या डायपरची दरमहा ३ लाखांहून अधिक पॅकेटची विक्री होते. परंतु, घरोघरी जाऊन कचरा संकलित करणाऱ्या घंटागाडीत हा कचरा अत्यल्प येतो. लाखोंच्या संख्येने वापरल्या जाणाऱ्या नॅपकिन, डायपरची विल्हेवाट कशी व कोठे लावली जाते हा गहन प्रश्न आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मते खुल्या जागा, कचरा कुंड्या आणि नाल्यांमधून हा कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पर्यावरण, आरोग्यासाठी घातक असलेल्या या कचऱ्याकडे प्रशासनाचेही साफ दुर्लक्ष होत आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’अभियान सुरू केले. या अभियानात छत्रपती संभाजीनगर महापालिकेला आतापर्यंत दोनदा पुरस्कार मिळाले. शहराला इंदूरपेक्षाही अधिक स्वच्छ करण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे. घनकचरा व्यवस्थापनात मागील सहा वर्षांमध्ये प्रशासनाला हवे तसे यश आले नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक, जलसाठे दूषित करणारी बाब म्हणजे वापरलेली सॅनिटरी नॅपकिन, डायपर होय. या बाबींचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन, विल्हेवाटही लावली जात नाही.

सत्यता काय?
‘लोकमत’ने शहरातील काही औषधी दुकानदारांसोबत चर्चा केली असता दरमहा दोन लाखांहून अधिक नॅपकिनच्या पॅकेटची (एका पॅकेटमध्ये सहा नग) विक्री होते. डायपर विक्रीची संख्या १ लाखाहून अधिक पॅकेट (एका पॅकेटमध्ये किमान सहा नग) आहे. महापालिकेच्या घंटागाडीत महिन्याला १७ ते १८ हजार डायपर नग, ३० हजारांहून अधिक नॅपकिन येतात. उर्वरित डायपर, नॅपकिन जातात कुठे, हा सर्वांत मोठा यक्ष प्रश्न आहे. पडेगाव, चिकलठाणा येथे जमा होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून डायपर, नॅपकिन बाजूला करणे जिकिरीचे काम आहे. कचरा वेचकांना अत्यंत धोकादायक पद्धतीने हे काम करावे लागते. वेगळा केलेला हा कचरा सिमेंट फॅक्टरीत जाळण्यासाठी पाठवावा लागतो.

दिसली जागा, दिले फेकून
शहरात अजूनही अनेक भागांत अघोषित कचरा कुंड्या आहेत. त्या कचरा कुंड्यांवर हा घातक कचरा आढळून येतो. उघड्या जागा, प्लॉट, नाले आणि विशेष बाब म्हणजे मोठ्या ड्रेनेजमध्येही हा कचरा सापडतो. ड्रेनेज विभागाचे कर्मचारी जेव्हा जेटिंग मशीनद्वारे चोकअप काढतात, तेव्हा हे प्रकार निदर्शनास येतात. पर्यावरणाच्या दृष्टीने या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने सोय करण्याची मागणी होत आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम काय सांगतो-
विल्हेवाटीसाठी पाकीट आवश्यक

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १७ नुसार नॅपकिनच्या प्रत्येक पाकिटासोबत विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पाकीट ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. कंपन्यांनी हा नियम सर्रास डावलला आहे.

मनपाकडेच सोय नाही
शहराची लोकसंख्या १८ लाखांपर्यंत आहे. ६० टक्क्यांवर महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. ७५ टक्के लहान मुलांसाठी डायपर वापरले जाते. वापरलेले डायपर, नॅपकिन घंटागाडीत टाकणाऱ्यांची संख्याही अत्यंत कमी आहे. हा कचरा संकलित करण्यासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही.

इंदूरमध्ये व्यवस्था काय?
महापालिकेने शहराला इंदूरसारखे स्वच्छ, सुंदर करण्याचा विडा उचलला आहे. इंदूर शहरात घंटागाडीसोबत एक लोखंडी डबा बसविला आहे. महिला येऊन त्या डब्यामध्ये डायपर, नॅपकिन टाकून निघून जातात. हा कचरा इंदूर महापालिका शास्त्रोक्त पद्धतीने जाळते.

काय म्हणते महापालिका?
महिलांना लागणारे नॅपकिन एका एनजीओमार्फत किंवा बचत गटामार्फत पुरवायचे. त्यांनीच ते जमा करून महापालिकेकडे आणून द्यावेत. महापालिका त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावेल, असा विचार सुरू आहे.
- ए.बी. देशमुख, शहर अभियंता.

विघटनासाठी ८०० वर्ष लागतात
सॅनिटरी नॅपकिन आणि डायपरमध्ये प्लास्टिक जास्त असते. या दोन्हीतही थँलेट अधिक असते. प्रत्येक सॅनिटरी नॅपकिन-डायपरचे विघटन होण्यासाठी अंदाजे ५०० ते ८०० वर्षे लागतात. एक महिला मासिक पाळीपासून रजोनिवृत्तीपर्यंत १० हजार सॅनिटरी नॅपकीन वापरते. सुरक्षित आरोग्यासाठी ते एकदाच वापरावे. त्यामुळे कचरा निर्माण होतो. महिन्याला एक अब्जाहून अधिक अविघटनकारी (नॉन-कंपोस्टेबल) सॅनिटरी नॅपकिन सांडपाणी निसर्गप्रणालीमध्ये प्रवेश करतात आणि ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन आणि जलस्रोत प्रदूषित करतात. प्रक्रिया न केलेले नॅपकिन, डायपर मोठ्या प्रमाणात रोगास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया, आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेला मोठा धोका निर्माण करतात.
-डॉ. बलभीम चव्हाण, पर्यावरण अभ्यासक.

नॅपकिन्स, डायपरची विल्हेवाट लावण्याची शास्त्रोक्त पद्धती:
१) सॅनिटरी नॅपकिन्स व डायपर शक्यतो इलेक्ट्रिक इन्सिनरेटर किंवा अन्य इन्सिनरेटर नावाच्या बंद उपकरणातच जाळले पाहिजेत.
२) केंद्रीय संकलन आणि इतर जैव कचऱ्याची विल्हेवाट असलेली उच्च ज्वलन व्यवस्था वापरावी.
३) सहजासहजी वावर नसलेल्या भागामध्ये जैव रासायनिक कचऱ्यासाठी कंपोस्टेबल प्रक्रियेत त्या कचऱ्यासोबत खोल पुरावे.
४) बंदिस्त खड्ड्यात जाळून राख पुरून टाकावी.
५) बायोमेडिकल कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियांचा अवलंब करावा.

Web Title: In Chhatrapari Sambhajinagar Sales of millions of baby diapers, napkins per month; Where do you throw? throwing wherever see a place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.