छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 9, 2023 02:37 PM2023-11-09T14:37:15+5:302023-11-09T14:39:33+5:30
तीनदिवसीय राम व हनुमान कथेची सांगता; पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलोट गर्दीला राम राम करीत ‘बागेश्वर धाम’कडे रवाना
छत्रपती संभाजीनगर : ‘छत्रपती संभाजीनगर के लोगों, तुमने मेरा दिल जीत लिया, हे शहर आता माझे झाले आहे... येथे मी पुन्हा पुन्हा येईन’, अशी साद घालत पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बुधवारी सायंकाळी भाविकांच्या अलोट गर्दीला ‘राम राम’ करीत मध्य प्रदेशातील ‘बागेश्वर धाम’ कडे रवाना झाले.
सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने आयोजित तीनदिवसीय राम व हनुमान कथेची सांगता झाली. महाराजांनी दिवाळी येथेच साजरी करावी, अशी असंख्य भाविकांची इच्छा होती. मराठवाडाच नव्हे, तर मुंबईसह इतर ठिकाणांहूनही भाविक कथा ऐकण्यासाठी आले होते.
महाराजांनी पिवळा कुर्ता घातला होता. गळ्यात उभे रुद्राक्ष व त्यास सोन्याचे कव्हर आणि त्यास श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाचे चित्र असलेले पेंडंट अशी माळ घातली होती. तेजस्वी, हसतमुख चेहरा सर्वांच्या नजरेस पडला तेव्हा ‘बागेश्वर धाम सरकार की जय’ असा जयघोष घुमला... ‘दया करो राम, सियाराम हनुमान’ हे भजन महाराज म्हणत होते. भाविक भजनात हरखून गेले.
‘भगवान श्रीरामावर आलेले संकट भगवान हनुमान दूर करू शकतात. तुम्ही हनुमान चालिसा वाचली तर तुमच्याही समस्या सुटू शकतील’, असे सांगत महाराजांनी सर्वांना हनुमान चालिसा पठण करण्याचा सल्ला दिला. ‘स्वाद छोडोगे तो बीमार नही पडोगे, और विवाद छोडोगे तो आनंदी रहोगे, असे निरोगी, आनंद जगण्याचे सूत्र महाराजांनी सांगितले. महाराजांनी सांगितले की, भगवान ‘खोज’नेसे नही मिलते, भक्तीमे ‘खो जाने’ से प्राप्त होते है.
तुमच्या समस्या आता बालाजीवर सोडा... मी आता दर एक ते दोन वर्षाने या शहरात दिव्य दरबार व हनुमान कथेसाठी येत जाईन, असे आश्वासन दिले. महाराजांचे जवळून दर्शन घेण्यासाठी हजारो लोक थांबले होते. सर्व सकल हिंदू जनजागरण समितीने केलेल्या तीन महिन्यांच्या अथक परिश्रमांनी राम, हनुमान कथा यशस्वी झाली, असे उद्गार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व निमंत्रक डॉ. भागवत कराड यांनी काढले.
पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी
सकल हिंदू जनजागरण समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ‘हिंदुहृदयाचार्य’ ही पदवी देण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व निमंत्रक डॉ. भागवत कराड यांनी ही पदवी प्रदान केली. यावेळी महावीर पाटणी, जगदीश बियाणी यांची उपस्थिती होती.