छत्रपती संभाजीनगरात जुगार अड्डे ठरतायत बालगुन्हेगार तयार करणारी ‘फॅक्टरी’!
By सुमित डोळे | Published: July 22, 2023 12:08 PM2023-07-22T12:08:04+5:302023-07-22T12:20:23+5:30
जुगाऱ्यांची वेगळीच दुनिया; मुले पिसतात पत्ते, बीअरपासून विदेशी दारुपर्यंत खुलेआम मिळते ‘सर्व्हिस’
छत्रपती संभाजीनगर : रात्रीचे नऊ वाजेची वेळ. अरुंद गल्ल्यातून वाट काढत पुढे जात असताना तरुण, वृद्ध, लहान मुलांचा गजबजाट..महिलांची घरात जाण्याची लगबग आणि पुढे जाताच काय दिसले? रस्त्याच्या दुतर्फा पत्त्यांचे अनेक डाव रंगलेले. या पत्त्यांच्या टेबलवर चक्क आठ, दहा वर्षांची निरागस मुले पत्ते पिसून वाटत होती. तरुण, वृद्ध डाव खेळण्यात मग्न हाेते. कोणी पाच, पंधरा, वीस हजारांचा डाव लावत होते. मध्येच एखादा लहानगा फिरत समोसा, भजी विकत घेण्यासाठी विनवणी करत होता. विशेष म्हणजे, बीअरपासून विदेशी दारुपर्यंत खुलेआम ‘सर्व्हिस’ मिळत होती, हे धक्कादायक वास्तव मुकुंदवाडीच्या संघर्षनगरमध्ये पाहायला मिळाले.
एकीकडे गुन्हेगारीचा दर वेगाने वाढत असताना दुसरीकडे गुन्हेगार निर्माण करणाऱ्या या ‘फॅक्टरी’ शहरात अनेक ठिकाणी खुलेआम सुरू आहेत. शहर अकराला सक्तीने बंद करणाऱ्या पोलिसांना लाखोंची उलाढाल असलेले जुगाऱ्यांचे हे जग कसे दिसत नाही, असा गंभीर प्रश्न आहे.
तीन वर्षांच्या तुलनेत २०२३ मध्ये सहा महिन्यांतच गुन्हेगारीचा दर ७० टक्क्यांनी वाढला. भर दिवसा व्यावसायिकांना चाकूने धमकावून पैसे मागितल्याच्या सलग घटना घडल्या. दुसरीकडे किरकोळ घटनांतही सर्रास हत्यारे उपसली जातात. टोळ्या एकमेकांवर प्राणघातक हल्ला करतात. यातील गुन्हेगार येतात काेठून, पोलिस यंत्रणा असताना सरेआम गुन्हेगारांची हिंमत होते कशी, असे गंभीर प्रश्न सामान्यांना आता पडत आहेत. या संदर्भात शहरातील वस्त्यांचा आढावा घेतला असता वरील धक्कादायक प्रकार दिसले. मुकुंदवाडीत तर याचे प्रत्यक्ष पुरावेच मिळाले.
काय आहे नेमका ‘डाव’?
खुलेआम असे जुगाऱ्यांचे अड्डे भरतात. त्यात तेरा पत्त्यांचा चार्ट मांडला जातो. बोलीनुसार पत्ता आत गेला तर पैसे परत मिळत नाहीत. मात्र, यात पत्ता बाहेर राहिला म्हणजेच बोली लागली तर लावलेल्या रकमेच्या थेट दुप्पट रक्कम मिळते. एकट्या मुकुंदवाडीत रोज लाखोंची उलाढाल होते. खेळणाऱ्याकडील पैसे संपेपर्यंत हे डाव चालतात. एका जुगाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा पहाटे तीन, चारपर्यंत हे डाव रंगतात. लहान मुले पत्ते वाटायला असतात. अल्पवयीन असल्याने त्यांना कायद्याने संरक्षण असल्याने त्यांना उभे केले जाते. अनेक जण यात कर्जबाजारी होऊन तणावग्रस्त होतात.
शहरात अनेक भागांत ...
- मुकुंदवाडीच्या संघर्षनगर, प्रकाशनगर, राजनगर, विमानतळ सुरक्षा भिंतीच्या लगत अनेक स्थानिक ‘भाऊ’, ‘दादां’चे असे अनेक अड्डे आढळतात. काही दिवसांपूर्वीच एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अशा अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा मारला होता.
- चिकलठाणा, वाळूज औद्योगिक वसाहत, पंढरपूर, बेगमपुरा, नारेगाव, मिसारवाडी इ. भागांत छुप्या पद्धतीने असा जुगार चालतो. कधी कधी त्यातील किरकोळ जुगाऱ्यांवर कारवाई होते. सहा महिन्यांत ४६ प्रमुख जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, बहुतांश मोठे क्लब आता शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीवर, हॉटेल, लॉजमध्ये चालविले जात असल्याचे या क्षेत्रातील माहितगाराने सांगितले. काही मातब्बर क्लब चालक करमणूक कराच्या नावाखालीही सर्रास क्लब चालवतात.
मुलांचे भविष्यच अंधारात
-एका डावाच्या ठिकाणी पत्ते वाटायला एक मुलगा असतो. मोठी माणसे पैसे गोळा करतात. येथेच गुन्हेगारीचे संस्कार होऊन ते गुन्हे जगतात सक्रिय होतात.
दारू विक्रीही जोरात
जुगाराव्यतिरिक्त स्थानिक दारूच्या अवैध विक्रीतून लाखोंची कमाई होते. भर रस्त्यावर दारू रिचवली जाते. सर्रास दारूचे बॉक्स पोहाेचवले जातात. राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र यापासून अनभिज्ञ आहे.