छत्रपती संभाजीनगरात खजुराच्या शेतीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक उंची
By साहेबराव हिवराळे | Published: August 5, 2023 08:36 PM2023-08-05T20:36:09+5:302023-08-05T20:36:30+5:30
चार वर्षापूर्वी गुजरातच्या कच्छ येथून ३३०० प्रति रोपटे या दराने खजुराची ६५ झाडे आणली होती
- कृष्णा नेमाने
शेंद्रा (छत्रपती संभाजीनगर) : दरवर्षी नापिकी, नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, मांडकी येथील प्रभाकर गायके या शेतकऱ्याने यावर उत्तम पर्याय शोधून खजुराची शेती सुरू केली. त्यातून वर्षाला दोन लाख रुपये मिळवले आहे.
प्रभाकर गायके यांनी चार वर्षापूर्वी गुजरातच्या कच्छ येथून ३३०० प्रति रोपटे या दराने खजुराची ६५ झाडे आणून एक एकर क्षेत्रात लागवड केली. या स्थितीत सदरील झाडे ६५ टक्के फळ लागण झाली आहे. या विक्रीतून एक लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी २ ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्नाची आशा आहे.
खजूर शेती फायदेशीर
शेतातील नापीक किंवा खडकाळ जमीन उपयुक्त ठरत असून त्यातून उत्पन्न मिळते. खजूर हे पीक दुष्काळग्रस्त भागातील असल्याने पाणी नाममात्र लागते, जिल्ह्यात यंदाही दुष्काळस्थिती असल्याने शेतकरी नाराज नाही. बांधावर खरेदीदार मिळत असून, ओल्या खजुरांना देखील बाजारात चांगला भाव मिळत आहे. माल विक्रीसाठी ग्राहक बांधावर मिळत असल्याने वाहतूक आणि इतरही अनेक खर्च वाचतात. त्यामुळे शेतकरी फायद्यात दिसत आहे. झाडाचे आयुर्मान १६० वर्षे हून अधिक असल्याने लागवड खर्च नगण्य होतो.
अंतर्गत पीक म्हणून फायदेशीर ठरत आहे. रोपटे महाग असल्याने बागेची मर्यादा पडते पण शेतकऱ्यांना अधिकृतपणे मार्गदर्शन केले गेले तर खूप फायदा आहे. या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे आणि चिंतामुक्त राहून आर्थिक प्रगती साधावी.
-प्रगतशील शेतकरी प्रभाकर गायके