छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई
By सुमित डोळे | Published: August 9, 2024 02:50 PM2024-08-09T14:50:11+5:302024-08-09T14:50:26+5:30
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश
छत्रपती संभाजीनगर : गुन्हे दाखल होऊनही शहरातील काही चौकांमध्ये तृतियपंथीयांचे पैसे मागण्याचे प्रकार थांबले नाही. त्यामुळे आता एकट्याने, समूहाने फिरून शहरात कुठल्याच भागात आस्थापना, लग्न, उत्सवात तृतीयपंथीयांना पैसे मागण्यासाठी जाता येणार नाही. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी याबाबत विशेष अधिकारान्वये आदेश जारी केले. पोलिस आयुक्त पवार यांच्या आदेशानुसार, दि. ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील. आवश्यकतेनुसार, त्या पुढे नव्याने हे काढले जातील.
मंगळवारी ‘आक्षेपार्ह इशारे’, ‘स्पर्श करून पैशांची मागणी’ करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, तरीही शहानूरमियाँ दर्गा चौकात बुधवारी तृतीयपंथी पैसे मागताना आढळून आले. पोलिसांनी चौकात बंदी घातल्यानंतर तृतीयपंथीयांकडून शोरुमध्ये नवे वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना हेरून, मोंढा, बाजारपेठ, लग्न, मुंज, वास्तुशांती सांरख्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अव्वाच्या सव्वा पैशांसाठी दादागिरी केल्याच्या तक्रारी उघडकीस येऊ लागल्या. नागरिकांना होणाऱ्या या मन:स्तापाबाबत पोलिस आयुक्त पवार यांनी कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले होते.
काय म्हटलेय आदेशात ?
-उपद्रव किंवा मोठ्या प्रमाणावर जनतेला धाेका निर्माण होण्यापासून रोखण्याच्या हेतूने भारतीय न्याय संहितेच्या १६३ नुसार पोलिस आयुक्तांना असे आदेश काढण्याचे अधिकार आहेत.
-त्यात अन्य भिक मागणाऱ्यांसह प्रामुख्याने तृतीयपंथीयांना एकट्याने, समुहाने शहरात फिरण्यास, निवासस्थान, आस्थापने, सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास मनाई करण्यात आली आहे.
-शिवाय, कुटूंबातील जन्म, मृत्यू, लग्न किंवा कुठल्याही उत्सवात भेट देण्यासही मनाई असेल.
-चौक, ट्राफिक जंक्शन, रस्त्यावरही वाहनचालक, प्रवासी, नागरिकांकडून पैसे घेण्यास सक्त मनाई असेल.