छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ सहकारी बँक, एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू

By सुमित डोळे | Published: October 11, 2023 01:40 PM2023-10-11T13:40:19+5:302023-10-11T13:41:06+5:30

आदर्श घोटाळ्याचे आता 'फाॅरेन्सिक ऑडिट', अपर महासंचालकांना प्रस्ताव सादर

In Chhatrapati Sambhajinagar, 3 more co-operative banks, one credit institution scam of crores are under investigation | छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ सहकारी बँक, एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ सहकारी बँक, एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पतसंस्था, सहकारी बँकांच्या घोटाळ्यांची मालिका अद्यापही सुरूच असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून नव्याने आणखी ३ सहकारी बँका व एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच यातही गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आदर्शच्या २०२ कोटींच्या घोटाळ्याचे आता 'फाॅरेन्सिक ऑडिट' होणार आहे. नुकतेच आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकांकडे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

११ जुलै रोजी सर्वप्रथम आदर्श घोटाळा समोर आला. गेली १३ वर्षे खुलेआम हा घोटाळा सुरू होता. ठेवीदारांनी यात तीव्र आंदोलन छेडल्यानंतर सहकार उपनिबंधक विभागाच्या भ्रष्टाचारी कारभारावर तीव्र ताशेरे ओढण्यात आले. त्यानंतर यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गटाची सहकारी संस्था, आभा इन्व्हेस्टमेंट, देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत गुन्हे दाखल झाले. त्याशिवाय, ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी, आधानेच्या आणखी एका संस्थेतही घोटाळे पोलिसांच्या रडारवर आहेत. आदर्श बँकेच्याही घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी सुरू असून अन्य दोन सहकारी बँकांच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यात सबळ पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

'फाॅरेन्सिक ऑडिट' म्हणजे काय?
-आदर्श घोटाळ्यात एसआयटीने सबळ पुरावे गोळा केले. साक्षीदारांच्या जबाबाला सोबतीला घोटाळ्यातील व्यवहाराचा प्रवास तंत्रशुद्ध पद्धतीने मांडण्यासाठी फाॅरेन्सिक ऑडिट केले जाईल. अपर महासंचालकांच्या मंजुरीसाठी तसा अहवाल व प्रस्ताव मंगळवारी मुंबईला पाठवण्यात आला.
-या ऑडिटसाठी राज्य शासनाच्या पॅनलवर ४३ सदस्य आहेत. या सर्वांना आर्थिक गुन्हे शाखेने मेलद्वारे माहिती पाठवली होती. त्यापैकी ८ जणांनी प्रत्युत्तर देत तयारी दर्शवली.
-त्यापैकी एकाला याची जबाबदारी सोपवून हे ऑडिट करण्यात येईल. पैसे कोठे, कसे, कुठे गेले, त्याचा ठोस कालावधी, त्याची गुंतवणूक कधी, केव्हा, कुठे झाली याचा यात सखोल तपास होऊन क्रम जोडून पुरावे उभे केले जाते. जे न्यायालयात वापरले जाऊ शकतात.
- मानकापेच्या संपत्ती विक्री प्रक्रियेस प्रारंभ
- अंबादास मानकापेच्या संपत्ती विक्री प्रक्रियेने आता वेग धरला आहे. पोलिस व प्रशासकांनी आतापर्यंत ९७ मालमत्ता सील केल्या आहेत. प्रशासकांनी त्यांपैकी पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रुग्णालय या संपत्ती विक्रीस काढल्या आहेत.

अन्य बँका ‘टेकओव्हर’ करणार
शहरातील नामांकित एक सहकारी बँक व एका सुस्थितीतील पतसंस्थेने आदर्श पतसंस्थेचे कर्ज टेकओव्हर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी सदर बँक ६० कोटी रुपयांचे कर्ज ‘टेक ओव्हर’ करील. शिवाय, कर्जवसुलीतून पहिल्या टप्प्यात प्रत्येक ठेवीदाराला जास्तीत जास्त २५ हजार रुपये देखील दिले जाणार आहेत.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar, 3 more co-operative banks, one credit institution scam of crores are under investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.