छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:21 PM2024-09-07T19:21:06+5:302024-09-07T19:21:44+5:30

जलवाहिन्यां टाकण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू

In Chhatrapati Sambhajinagar, 300 km of roads were broken for water channels, repairs are underway | छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यातील ९३० किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक ठिकाणी सिमेंट आणि डांबरी रस्ते खोदावे लागले. ३०० किमी रस्ते खराब झाले. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जीव्हीपीआर कंपनीमार्फत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ही प्रक्रिया बरेच दिवस चालणार असल्याचे मजीप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले.

खंडपीठाच्या आदेशानुसार जलवाहिन्यांसाठी रस्ते खोदण्यास सुरुवात झाली. महापालिकेने रस्ते खोदण्यापूर्वीच दुरुस्तीची अटही घातली. त्यानुसार रस्ते फोडण्यात आले. काही भागात नागरिकांनी रस्ते खोदण्यासाठी विरोध दर्शविला. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर विरोध मावळला. सातारा-देवळाई आणि जुन्या शहरात अलीकडेच मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट, डांबरी रस्ते तयार केले आहेत. ते रस्ते फोडण्याची नामुष्की येत आहे. रस्ते फोडण्याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पर्याय नाही. आतापर्यंत ३०० किमी लांबीचे रस्ते फोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीकडून रस्ते दुरुस्त करून घेतले जात आहेत. जुन्या शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदावे लागणार आहेत.

रस्ते दुरुस्तीची पद्धत अशी
ज्या ठिकाणी रस्ते फोडले तेथे अगोदर माती टाकण्यात येते. किमान ही माती सहा ते आठ महिने मोकळी सोडली जाते. पावसाने आणि वाहनांच्या वर्दळीने माती सेट झाली पाहिजे. दुरुस्तीपूर्वी खडीकरण केले जाते. त्यानंतर खडी सेट झाल्यावर डांबरीकरण किंवा सिमेंट पद्धतीने दुरुस्ती केली जाते.

रस्ता त्वरित दुरुस्त करा
अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकल्यानंतर नागरिक रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करीत आहेत. ताबडतोब रस्ता दुरुस्त करताच येत नाही. केला तरी तो जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सहा ते आठ महिन्यांचा वेळ गेल्यानंतरच रस्ते दुरुस्त करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar, 300 km of roads were broken for water channels, repairs are underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.