छत्रपती संभाजीनगरात समुद्रसपाटीपासून २१३४ फूट उंचीवर आहे धार्मिक पर्यटनस्थळ, पाहिले का?
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 3, 2024 04:31 PM2024-01-03T16:31:57+5:302024-01-03T16:32:22+5:30
गणेश टेकडीवर गेल्यावर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे विहंगम दृश्य एका नजरेत पाहण्यास मिळते.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वात उंच ठिकाणी, म्हणजे सातपुड्याच्या डोंगररांगेत समुद्रसपाटीपासून २,१३४ फूट उंचावर असलेली ‘गणेश टेकडी’ हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. निसर्गरम्य वातावरणात, नागमोडी वाटा, उंचावर साहसी चढाई करण्याची ज्यांना आवड आहे, अशांसाठी हे शहरातील धार्मिक स्थळ पर्वणीपेक्षा कमी नाही. मग चला, नवीन वर्षाची सुरुवात गणेश टेकडीवर चढाई करून गणरायाचे दर्शन व शहराचे विहंगम दृश्य पाहूया...
कुठे आहे गणेश टेकडी?
पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तर बाजूस ‘बीबीका मकबरा’ व हनुमान टेकडी यांच्या पूर्व बाजूस एक मोठी टेकडी दिसते. तेथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. तीच ‘गणेश टेकडी’ होय. हनुमान टेकडीपासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.
नागमोडी वाटा, ७९ पायऱ्या
हनुमान टेकडीला वळसा घालून आपण पूर्व बाजूला जात असताना खडकाच्या नागमोडी वाटांतून गणेश टेकडीकडे जाताना शहराचा नजरा बघण्यास मिळतो. मध्यावर गेल्यावर पायऱ्या दिसायला लागतात. ७९ पायऱ्या चढून वर गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर जाऊन आपण पोहोचतो. समुद्रसपाटीपासून २,१३४ फूट उंचीवर आपण येऊन पोहोचलो, याचा आनंद होतो. गणपती व शहराच्या दर्शनाने सर्व थकवा निघून जातो.
एका नजरेत शहराचे विहंगम दृश्य
गणेश टेकडीवर गेल्यावर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे विहंगम दृश्य एका नजरेत पाहण्यास मिळते. उंचावर उभारलेला भगवा ध्वज, समोरील बाजूस बीबीका मकबरा, हनुमान टेकडी, दूर दिसणारी गोगाबाबा टेकडी एवढेच नव्हे दक्षिण बाजूला साताऱ्याच्या डोंगररांगा आणि उंच उंच इमारती, चोहो बाजूंनी आपल्या शहराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते.
अमेझॉनच्या जंगलासारखी वाटणारी हिमायत बाग
दाट गडद हिरवी झाडी असलेला मोठा भूभाग गणेश टेकडीवरून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अमेझॉनच्या जंगलासारखा वाटणारा हा भाग प्रत्यक्षात मुगलकालीन ‘हिमायत बाग’ होय.
भाविकांच्या एकजुटीचे प्रतीक
गणेश टेकडीवर सुमारे १५० वर्षे जुनी दगडी गणपतीची मूर्ती होती. २१ व २२ एप्रिल २०२२ ला येथे जयपूरहून आणलेल्या संगमरवरी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जेथे साधे पायी चालणे कठीण, तेथे भाविकांनी विटा, वाळू, सिमेंट, सळ्या, पाणी वर नेले. त्यातूनच टेकडीवर जाण्यासाठीच्या पायऱ्या व छोटे मंदिर उभे राहिले. यासाठी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, हिमायतबाग, हडको, हर्सूल परिसरातील भाविकांनी तन, मन, धनाने सेवा केली.