व्हेरी स्मार्ट! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’

By मुजीब देवणीकर | Published: June 29, 2024 05:02 PM2024-06-29T17:02:19+5:302024-06-29T17:03:04+5:30

मनपाच्या सर्व शाळा स्मार्ट असल्यामुळे पालकांचा ओढा मनपा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी वाढलेला आहे, अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगवर

In Chhatrapati Sambhajinagar, admissions in 22 municipal schools 'full', some students on waiting list | व्हेरी स्मार्ट! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’

व्हेरी स्मार्ट! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सर्वच शाळा आता स्मार्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवेशांसाठी पालकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होताच महापालिकेच्या २२ शाळांमध्ये प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत. आणखी काही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मनपाच्या काही शाळांच्या खोल्या वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

महापालिकेच्या शाळेत २०२३-२४ मध्ये प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये विशेष करून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करणे, आम्हाला खेळू द्या, स्मार्ट गुरू ॲपची निर्मिती, सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना, कंटेनर लायब्ररी. यामुळे मनपा शाळांचा दहावीचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला आहे.

मनपाच्या सर्व शाळा स्मार्ट असल्यामुळे पालकांचा ओढा मनपा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी वाढलेला आहे. या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपाच्या नारेगाव मराठी आणि उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या चार-चार तुकड्यांचे प्रवेश ‘फुल्ल’ झाले होते. त्यानंतर इतर शाळांमध्येही प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांच्या रांंगा लागल्या. महापालिकेच्या २२ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पूर्ण झाली.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar, admissions in 22 municipal schools 'full', some students on waiting list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.