छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा'
By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2024 07:10 PM2024-06-20T19:10:45+5:302024-06-20T19:12:01+5:30
दिवसाला ८० जणांच्या अर्जाची पडताळणी : पंधरा दिवसांत पासपोर्ट येतो घरी
छत्रपती संभाजीनगर : आपले शहर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जत आहे. परंतु पासपोर्टसाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दीड महिना मुलाखतीसाठी थांबावे लागत आहे. कागदपत्रांत त्रुटी नसल्यास १५ दिवसांत पासपोर्ट घरी येतो, अशी हमी पोस्टाच्या पासपोर्ट सेवा केंद्राने दिली आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी मुंबई, नाशिकला जावे लागत होते. टपाल कार्यालयाने ही अडचण लक्षात घेऊन येथे सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राला अत्यंत चांगला प्रतिसाद असून, उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी तसेच उद्योजक यांना पासपोर्ट सेवा अगदी स्वत: ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी केल्यावर मोबाईलवर मुलाखतीची तारीख आणि वेळ देखील येतो.
पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
जन्मतारीख पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही एक) तपशील असा
जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, हस्तांतरण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी पेन्शन ऑर्डर, शासन सेवा आदेश, एलआयसी प्रमाणपत्र, तसेच पाणी बिल, टेलिफोन (लँडलाइन किंवा पोस्ट पेड मोबाईल बिल), वीज बिल, आयकर मूल्यांकन आदेश, निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र, गॅस कनेक्शनचा पुरावा, लेटर हेडवर नामांकित कंपन्यांच्या नियोक्त्याकडून प्रमाणपत्र.
पत्त्याचा पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही दोन)
जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत (कौटुंबिक तपशिलांसह पहिले आणि शेवटचे पान), (अर्जदाराचा सध्याचा पत्ता जोडीदाराच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या पत्त्याशी जुळत असल्यास)
पालकांच्या पासपोर्टची प्रत, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत (पहिले आणि शेवटचे पृष्ठ), आधार कार्ड, नोंदणीकृत भाडे करार, चालू बँक खात्याचे फोटो पासबुक (अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँका आणि केवळ प्रादेशिक ग्रामीण बँका) १० वी, १२ वी किंवा पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
सेतू केंद्रात अजून काही सेवासुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. त्या पूर्ण केल्यास दीड महिन्याची प्रतीक्षा कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.