छत्रपती संभाजीनगरात पुन्हा वनरक्षक परिक्षेत ‘ऑनलाइन कॉपी’च्या तीन घटना समोर
By सुमित डोळे | Published: August 4, 2023 11:39 AM2023-08-04T11:39:40+5:302023-08-04T11:40:00+5:30
आदल्या दिवशी कारवाई, दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन उमेदवार रंगेहात सापडले
छत्रपती संभाजीनगर : वनरक्षक परीक्षेतील उमेदवारांना चिकलठाण्यातील शिवराणा करिअर अकॅडमीतून ऑनकॉल उत्तरे पुरविले जात असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. यात एक आरोपी अटक होऊन संचालक सचिन गोमलाडू ऊर्फ राजपूत हा पळून गेला. तरीही वनरक्षकाच्या परीक्षेतच बुधवारी शहरातील तीन सेंटरवर ‘ऑनलाइन कॉपी’ करताना उमेदवार रंगेहात पकडले गेले. प्रवेशावेळीच कसून तपासणी होती म्हणून घोटाळेबाजांनी आधीच ठरलेल्या परीक्षार्थींसाठी सेंटरच्या बाथरूममध्ये कॉपीसाठीचे कार्ड, मख्खी हेडफोन व इतर साहित्य लपवून ते नेमके कोठे ठेवलेय, हे सांगितले गेले होते.
पहिली घटना
सुराणानगर येथील बाइट्स इन्फोटेक येथे बुधवारी वनरक्षक ऑनलाइन परीक्षेचे केंद्र होते. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसह वनविभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कवडे केंद्र अधिकारी होते. परीक्षेदरम्यान त्यांना नितीन संजय बहुरे (वय १९, रा. घोडेगाव) हा कच्च्या कागदावर काहीतरी लिहिताना आढळला; परंतु तो पेपर सोडवत नव्हता. संशय आल्याने त्याची अंगझडती घेतल्यावर मोबाइल, मास्टर कार्ड रिडर, कानात मख्खी हेडफोन आढळला. मित्र करण चत्तरसिंग गुसिंगे (रा. पिवळवाडी) याने त्याला पैशांच्या बदल्यात उत्तर पुरविण्याचे काम घेतले होते. केंद्रावर जाताच बाथरूममध्ये साहित्य कुठे ठेवले, हे सांगितले होते. नितीनने परीक्षा सुरू झाल्यावर लघुशंकेचा बहाणा करून साहित्य आणून टेलिग्रामवर फोटो पाठवीत होता. जिन्सी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दुसरी घटना
चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल येथे सचिन अंबादास राठोड हा परीक्षार्थी परीक्षा सुरू असताना अचानक लघुशंकेला जाऊन आला. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल मराठे यांना संशय आल्याने तपासणी केली असता त्याच्याकडे वायर्ड हेडफोनचा सेटच आढळून आला. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.
तिसरी घटना
बीड बायपासवरील एक्सलन्स कॉम्प्युटर सेंटर येथे बी.ए. उत्तीर्ण सतीशसिंग मदनसिंग जारवाल (२८, रा. गंगापूर) हा असाच रंगेहात सापडला. मख्खी हेडफोन, सीमकार्डचे इलेक्ट्रिक ब्लू टूथ डिव्हाइसद्वारे समोरील व्यक्ती त्याला उत्तरे पुरवीत होती. यासाठी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.