एकाच वेळी ३ विमाने लॅंडींगसाठी सज्ज; एक विमान लँड करताना पुन्हा गेले हवेत, प्रवाशी गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:56 AM2024-08-13T11:56:18+5:302024-08-13T11:57:15+5:30
चिकलठाणा विमानतळावरील घटना : आकाशात घिरट्या मारून विमानाचे लँडिंग, प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे एअर इंडियाचे दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान अचानक पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना सोमवारी रात्री घडली. एकाच वेळी तीन विमाने आल्याने हा प्रकार घडला. या घटनेने दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
चिकलठाणा विमानतळावर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंधरा मिनिटांच्या अंतराने आकाशात एकाच वेळी इंडिगोचे मुंबई, हैदराबाद आणि एअर इंडियाचे दिल्ली विमान दाखल झाले. यावेळी एअर इंडियाचे विमान लँडिंगच्या तयारीत होते. मात्र, त्याच वेळी या विमानाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हे विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि शहराच्या आकाशात घिरट्या मारू लागले. अचानक झालेल्या या प्रकाराने विमानातील प्रवासी काहीसे गोंधळून गेले. मात्र, कोणतीही घटना घडली नसून, खबरदारीच्या दृष्टीने विमान आकाशात झेपावल्याची माहिती मिळाली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
एअर इंडियाचे विमान आकाशात झेपावल्यानंतर सर्वांत आधी मुंबईचे विमान लँड झाले. त्यानंतर हैदराबाद होऊन आलेले विमान लँड झाले आणि या दोन्ही विमानांनंतर एअर इंडियाचे दिल्लीचे विमान लँड झाले.
काय म्हणाले अधिकारी?
याविषयी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, एकाच वेळी तीन विमान आल्याने हा प्रकार झाला. मात्र, कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नव्हती. उतरणाऱ्या विमानाला रनवे लाइन न मिळाल्याने अनेकदा अशा प्रकारे पुन्हा आकाशात झेपावत असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.