छत्रपती संभाजीनगरात बँकांकडे १५ कोटींच्या नाण्यांचा डोंगर !
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 29, 2023 05:08 PM2023-07-29T17:08:01+5:302023-07-29T17:08:12+5:30
सर्वत्र डिजिटल व्यवहार वाढत असून कोणीच सुटी नाणी बाळगण्यास तयार नाही. एसबीआयने तर नाणी ठेवण्यासाठी चक्क डेपोच उघडला आहे
छत्रपती संभाजीनगर : व्यवहारात अनेकजण नाणी घेण्यास नकार देत असल्याने शहरातील ५ बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये तब्बल १५ कोटींपेक्षा अधिकची नाणी साठली आहेत. आघाडीची राष्ट्रीयीकृत बँक एसबीआयने डेपोच तयार केला असून त्यात ७ कोटी रुपये मूल्यांची नाणी साठविली आहेत. ५ वर्षांपासून बँकांमध्ये नाण्यांचा साठा एवढा झाला आहे की, आता शहरातील ५ करन्सी चेस्टमध्ये नाणी ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही.
डिजिटल व्यवहाराने नाण्यांचे झाले महत्त्व कमी
सर्वत्र डिजिटल व्यवहार वाढत असून कोणीच सुटी नाणी बाळगण्यास तयार नाही. जिथे सुट्या पैशांचा प्रश्न येतो, तेथे लोक डिजिटल पेमेंट करीत आहेत. व्यवहारात नाण्यांचा कमी वापर होण्याचे, हे महत्त्वाचे कारण आहे.
शहरात किती करन्सी चेस्ट ?
शहरात एसबीआयचे दोन करन्सी चेस्ट, याशिवाय सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक असे मिळून पाच बँकांचे ६ करन्सी चेस्ट आहेत.
नाणी देणारी मशीन बँकेत
सेंट्रल बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये ‘कॉइन वेडिंग मशीन’ बसविण्यात आली आहे. यात वरील कप्प्यात नोटा टाकल्या की, दुसऱ्या कप्प्यातून तेवढ्या मूल्यांची नाणी बाहेर येतात.
प्रत्येक व्यापाऱ्याकडे ५ ते १५ हजारांची नाणी
शहरात प्रत्येक व्यापाऱ्यांकडे ५ ते १५ हजार रुपयांची नाणी आहेत. त्यात १० रुपयांची नाणी जास्त आहेत. नाण्यांचा व्यवहार वाढण्यासाठी रिझर्व्ह बँक नोटा कमी देत आहे.
- संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
नाण्यांचे काय करायचे? मंदिर ट्रस्टींना प्रश्न
मंदिराच्या तिजोरीत भाविक नाणी टाकतात. आमच्याकडेच २१ हजार रुपयांची नाणी साठली आहेत. बँका नाणी घेत नाहीत. त्या म्हणतात, व्यवहारात चालवा. ही समस्या सर्व मंदिरांची आहे.
- संदीप करवा, सचिव, श्री शिव गणेश मंदिर, अहिंसानगर.
नागरिकांनी नाणी व्यवहारात आणावीत
१ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये, २० रुपयांनी नाणी व्यवहारात असून ग्राहकांनी ती स्वीकारावीत. ज्यांना नाणी लागत असतील, त्यांनी बँकांमधून घेऊन जावीत.
- हेमंत जामखेडकर, कोषाध्यक्ष, एआयसीबीईएफ