छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

By मुजीब देवणीकर | Published: August 19, 2023 01:00 PM2023-08-19T13:00:28+5:302023-08-19T13:01:12+5:30

१ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले.

In Chhatrapati Sambhajinagar, dengue increased with eye infection | छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या डोळ्यांची साथ जोरदार सुरू आहे. त्यात आता डेंग्यूची भर पडली असून, मागील १८ दिवसांमध्ये तब्बल ५९ संशयित, तर १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला; पण मनपाकडे त्याची नोंद नाही.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. डासांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी मलेरिया विभागाचे सर्व कर्मचारी एकत्र आणून झोननिहाय धडक ॲबेट, धूर फवारणी, औषध फवारणी मोहीम राबविली. १ लाखांहून अधिक घरांमध्ये तपासणी केली. त्याचे परिणामही दिसले. काही दिवस डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण नव्हते; पण ऑगस्ट महिना सुरू होताच रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. १ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले. खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा मृत्यू झाला; पण खाजगी रुग्णालयांनी यासंदर्भातील माहिती दिली नसल्याचे साथरोग मोहीम अधिकारी अर्चना राणे यांनी सांगितले.

डेंग्यू- २०२१
संशयित - २६६
पॉझिटिव्ह-५७
डेंग्यू- २०२२
संशयित-२३२
पॉझिटिव्ह- ६१
डेंग्यू- २०२३
संशयित-१७५
पॉझिटिव्ह-५७
(१८ ऑगस्टपर्यंत)

उपाययोजना कोणत्या?
घराच्या आसपास पाणी थांबू देऊ नका.
कूलरमधील पाणी आठवड्यातून एकदा बदला.
घरात कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.
मुले, मोठ्या व्यक्तींनी अंगभर कपडे घालावेत.
मच्छरदाणीचा वापर करावा.
डास पळविणाऱ्या औषधांचा घरात वापर करावा.
पाण्याचे साठे नेहमी झाकून ठेवले पाहिजेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच
ज्या भागात डेंग्यू पॉझिटिव्ह, संशयित रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागात अधिक लक्ष केंद्रित केले असून, युद्धपातळीवर कोरडा दिवस, धूर, औषध फवारणी, ॲबेट ट्रीटमेंट आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

काय म्हणतो हाउस इंडेक्स ?
ज्या भागात पाण्यात डासअळ्या मोठ्या प्रमाणात येतात, त्या भागातील हाउस इंडेक्स दररोज मनपाकडून काढण्यात येतो. त्या भागात व्यापक उपाययोजना केल्या जातात. शुक्रवारी मसनतपूर, संजयनगर-बायजीपुरा, रवींद्रनगर, शहाबाजार, भरतनगर-एन-१३, चाउस कॉलनी, काचीवाडा, सिद्धार्थनगर, पदमपुरा भागांचा हाउस इंडेक्समध्ये समावेश होता.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar, dengue increased with eye infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.