छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघात टाळण्यासाठी २७ ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर

By विकास राऊत | Published: May 30, 2024 08:18 PM2024-05-30T20:18:32+5:302024-05-30T20:20:16+5:30

आठ विशेष वाहने तैनात : वाहनचालक, अल्पवयीनांचे समुपदेशन करावे

In Chhatrapati Sambhajinagar district, cameras are in sight at 27 places to prevent accidents | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघात टाळण्यासाठी २७ ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघात टाळण्यासाठी २७ ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत अपघात टाळण्यासाठी २७ ठिकाणी कॅमेरे लावण्यात येत आहेत. जिल्ह्यात ९७ अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून तेथे आवश्यक ते स्थापत्य बदल करण्याची उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, तसेच वाहनचालक व अल्पवयीन मुलांचे पालकांचे यासंदर्भात उद्बोधन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. शहरी व ग्रामीण भागात रस्ते अपघाताच्या संख्येवर नियंत्रण आणणे, वाहन चालविताना नियमभंग करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आठ विशेष वाहने तैनात करण्यात येत आहेत. हे पथक वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन, हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवून तत्काळ उपाययोजना करतील. त्यात अधिकाऱ्यांमार्फत वाहनचालकांचे समुपदेशनही होईल. जिल्ह्यात रस्ते अपघात व अपघातात मृत्यू होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळे निश्चित करण्यात यावीत. त्यात आवश्यक ते स्थापत्य बदल, दिशादर्शक व सूचनाफलक लावण्याची कारवाई करावी.

बैठकीस जि. प. विकास मीना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशू पाटील, उपअभियंता एच. के. ठाकूर, मनपा अति. आयुक्त रणजीत पाटील, पोलिस उपअधीक्षक प्रकाश चौगुले, मनपा अभियंता ए. बी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे आदी उपस्थित होते.

‘हायवा’वर कारवाई करा
विनानंबर प्लेट चालणारी वाहने विशेषतः वाळू वाहतूक करणारे ‘हायवा’ यांच्यावर कारवाई करावी. गॅस टँकर्ससाठी त्यांच्या नेमून दिलेल्या मार्गांवरून वाहतूक करण्याबाबत उपाययोजनांची गरज आहे.

पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. अल्पवयीन वाहनचालकांकडे वाहन चालविण्यास देऊ नये, यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 

 

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar district, cameras are in sight at 27 places to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.