छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार
By संतोष हिरेमठ | Published: November 24, 2024 11:33 AM2024-11-24T11:33:57+5:302024-11-24T11:37:44+5:30
कन्नडमधून संजना जाधव विजयी; यापूर्वी दोन वेळा महिला उमेदवारांचा पराभव
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संजना जाधव यांच्या माध्यमातून गेल्या ३४ वर्षांत जिल्ह्यात शिवसेनेला (शिंदेसेना) पहिल्यांदाच महिला आमदार मिळाल्या. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही महिला उमेदवारांचा पराभव झाला होता. यंदा मात्र, संजना जाधव यांनी सेनेच्या महिला उमेदवारांचा पराभव खंडित करून विजय खेचून आणला.
विधानसभा निवडणुकीत गेल्या ३४ वर्षांत शिवसेनेने ३९ जणांना उमेदवारी दिली. यात अवघ्या २ महिलांचा समावेश होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा उद्धवसेना आणि शिंदेसेना असे शिवसेनेचे दोन गट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आले. शिंदेसेनेने कन्नडमधून भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या माध्यमातून महिला उमेदवाराच्या हाती ‘धनुष्यबाण’ दिला.
शिवसेनेने गेल्या ३४ वर्षांत जिल्ह्यात अवघ्या दोन मतदारसंघांत महिला उमेदवार दिल्या. मात्र, या दोन्ही महिला उमेदवारांचा पराभव झाला. यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, शिंदेसेनेकडून संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते.
यापूर्वी ‘धनुष्यबाणा’वर लढलेल्या महिला उमेदवार
गंगापूर मतदारसंघात १९९५ मध्ये शिवसेनेने आशा श्रीमंतराव थोरात यांना उमेदवारी दिली, तर २०१४ मध्ये पूर्व मतदारसंघात कला ओझा यांना ‘धनुष्यबाण’ या निशाणीवर म्हणजे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढल्या. मात्र, या दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.