दारूड्या निलंबित फौजदाराने ‘आय लव्ह यू’ म्हणत विवाहितेचा हात धरला; नागरिकांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:57 PM2023-04-05T12:57:50+5:302023-04-05T12:58:14+5:30
दारूच्या नशेत कॉलनीत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी आधीच आहे निलंबित
छत्रपती संभाजीनगर : दारूच्या नशेत मयूरबन कॉलनीत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षकाने दीड महिन्यातच पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढली. आधी ‘आय लव्ह यू’ म्हणून जाऊन पुन्हा बुलेटवरून येत हात धरला. हा प्रकार कॉलनीवासीयांना समजल्यावर त्यांनी बोडलेला बेदम चोप दिला. मंगळवारी सायंकाळी प्रकार घडला.
अनिल बोडले असे आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. दीड महिन्यांपूर्वी तो सातारा ठाण्यात कार्यरत होता. सध्या तो निलंबित असल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले. १७ फेब्रुवारीला त्याच्याविरुद्ध आधीचा गुन्हा नोंदविलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विवाहितेने जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली आहे. ४ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता त्या घरी असताना, तेथून जाणाऱ्या अनिल बोडलेने त्यांना पाहून ‘आय लव्ह यू’ असे दोनवेळा म्हटले. त्यामुळे पीडिता त्याच्यावर ओरडल्या होत्या. मात्र तो तसाच उभा राहिल्याने पीडितेने घराचा दरवाजा बंद केला. ही माहिती त्यांनी पतीला फोन करून दिली. पती कामात असल्याने त्यांनी आईला तत्काळ घरी पाठविले. काही वेळातच पतीही आले. दरम्यान, पीडिता दुसऱ्या महिलांशी बोलत असताना बोडले बुलेटवरून (एमएच २०, ईबी ९९१८) आला. त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर आठ ते दहा महिला, पुरुषांनी त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. तेव्हा बोडले हा नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले.
पकडून आणले पोलिस ठाण्यात
जमावाकडून मारहाण सुरू असतानाच जवाहरनगर ठाण्यातील पोलिस आले. त्यांनी बोडलेला जमावाच्या तावडीतून सोडविले आणि वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सीताराम केदारे करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.