खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम
By साहेबराव हिवराळे | Published: July 25, 2023 01:11 PM2023-07-25T13:11:41+5:302023-07-25T13:11:59+5:30
छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक खंडोबा मंदिर; त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगडांचा वापर, नक्षीकामास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा परिसरातील मंदिराचा जीर्णोद्धार होण्यास सुरुवात झाली आहे. आधुनिक यंत्राचा वापर करत खंडोबा मंदिराचे अवशेष जोडण्यासाठी आता सुनियोजित घडणावळ सुरू झाली आहे. यंत्राचा वापर करत आता दगड चक्क हेमाडपंथी आकार घेऊ लागले आहेत.
काय झाले होते?
वातावरणासह विविध कारणांनी झालेली दगडांची झीज, कलाकुसरी असूनही त्याचे बिघडलेले नक्षीकाम, ओबडधोबड झालेली घडणावळ आणि जीर्णोद्धारास आलेले मंदिर अशी काहीशी अवस्था सातारा परिसरातील खंडोबा मंदिराची झाली होती. स्थापत्य विभागाच्या देखरेखीखाली व शासकीय निधीअभावी या मंदिराचे काम रखडले होते.
काय होत आहे?
मंदिर जीर्णोद्धारास आता शासकीय निधी मिळाला आहे. मंदिराच्या संवर्धनाचे काम अखेर सुरू झाले आहे. दगडावर नक्षीकाम केले जात आहे, हेमाडपंथी मंदिराच्या कलाकुसरीस धक्का न लागू देता काम सुरू झाले आहे. कारागीरांनी विशिष्ट स्थापत्य विभागाच्या देखरेखीखाली दगडाला आकार देणे सुरू केले आहे. तुटलेल्या दीपमाळेला काढून त्या जागी नवीन घडविलेल्या खणाला बसविण्यात येणार आहे.
किती जणांची टीम कार्यरत?
मंदिराच्या कामासाठी ३५ तज्ज्ञ कारागिराची टीम येथे कार्यरत आहे. त्यांच्या कारागिरीतून आकार दिला जात आहे. मंदिराच्या दीपमाळेच्या तयारीसाठी तसेच सभामंडप आणि इतर घडीव दगडावर नंबर देखील टाकण्यात येत आहेत. ऑर्किटेक्ट या कारागिरांना दगडावर योग्य डिझाईन काढून देत आहेत. कोणता दगड किती फूट तसेच किती रुंद आकाराचा आहे, तो कसा मंदिराच्या नक्षीदार दगडाशी जुळेल याचादेखील अभ्यास इंजिनिअरिंगच्या टीमकडून होत आहे.
विखुरलेल्या दगडावर कोरीव काम..
मंदिराच्या उभारणीत त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगड विखुरले गेले होते, त्यातील बहुतांश दगड या टीमने त्यांच्याकडे घेऊन त्यावर नक्षीकाम सुरुवात झाले आहे.
पारंपरिक पद्धतीने काम सुरू..
मंदिराच्या कळसापासून वीटकाम तसेच चुना व पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मोठ्या आकाराच्या विटा घडविण्याचे काम सुरू आहे.
दोन वर्षे काम चालणार..
मंदिराच्या निर्माण कामाचा कालावधी दोन वर्षाचा असून, मंदिराच्या कळसाचे काम लवकर होईल, परंतु नक्षीकाम तसेच दीपमाळ सभामंडपाचे काम दोन वर्षांत टीम पूर्ण करणार आहे.