पुन्हा एकदा चोरट्यांची लग्नात हातसफाई; ७ तोळे सोन्यासह रोख रक्कम, मोबाइल लंपास
By राम शिनगारे | Published: December 11, 2023 12:06 PM2023-12-11T12:06:04+5:302023-12-11T12:10:01+5:30
शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात झाल्यानंतर कार्यालयातून दागिन्यांसह इतर ऐवज चोरण्यासाठी धडाकाच चोरट्यांनी लावला आहे. त्यात आणखी एका घटनेची भर पडली. सेव्हन हिल परिसरातील अतिथी हॉटेलमधील लग्नातून चोरट्यांनी ७ तोळे सोने, १६ हजार रुपये रोख आणि मोबाइल असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. २४ नोव्हेंबरपासून ही सहावी घटना आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अवंती शिरीष कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे भाऊ जयेश कुलकर्णी यांच्या लग्नाचा सोहळा अतिथी हॉटेलच्या डायमंड हॉलमध्ये आयोजित केला होता. ५ डिसेंबरच्या सायंकाळपासून ते ६ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सोहळा चालला. सप्तपदी सुरू असताना शिरीषच्या आईने त्यांची पर्स अवंतीकडे दिली. त्याच वेळी अवंती यांना बहिणीने हाक मारली असता त्यांनी पर्स खाली ठेवली आणि बहिणीकडे आहेर देण्यासाठी गेल्या. तितक्यात पर्स चोरीला गेली. पर्समध्ये साडेतीन तोळ्यांची पोत, ३१ ग्रॅमचे गंठण, तीन ग्रॅमचे टॉप्स आणि २ ग्रॅमची कर्णफुले, १६ हजार रुपये रोकड, १५ हजारांचा मोबाइल, असा चार लाख ५९ हजार ५२४ रुपयांचा ऐवज होता. हा प्रकार लक्षात आल्यावर ९ डिसेंबरला सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार बन करीत आहेत.
२४ नोव्हेंबरपासून सहावी घटना
२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत शहरातील प्रसिद्ध हॉटेल, मंगल कार्यालयात चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या. त्यात पहिली घटना हर्सूलच्या मधुरा लॉनमध्ये घडली. त्यानंतर सूर्या लॉन्स, हॉटेल रामा, हॉटेल जिमखाना या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यानंतर पाचवी घटना बीड बायपासवरील एका बड्या हॉटेलमध्ये घडली. मात्र, त्या प्रकरणात गुन्हा नोंदवला नाही. सहावी घटना अतिथी हॉटेलमध्ये उघडकीस आली. ३ डिसेंबर रोजी हॉटेल रामा व औरंगाबाद जिमखाना येथे घडलेल्या चोरीत एकच चोर असल्याचे निष्पन्न झाले.
आनंदाच्या क्षणात नुकसान टाळा
-शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत.
- गर्दीत प्रत्येकाला तपासणे, संशय घेणे दोन्ही कुटुंबांना अशक्य असते. शिवाय, हॉटेल, लॉनचालकाला देखील प्रत्यक्षात ते शक्य नसते.
- वधू, वराचे दागिने सांभाळण्यासाठी जबाबदार व्यक्ती निवडा.
- भेटीत येणारी रोख रकमेची पाकिटे सांभाळा.
- अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे असलेले लॉन, हॉटेल लग्न व अन्य कार्यक्रमासाठी निवडा.
- कॅमेरे असल्यास ते सुस्थितीत, सुरू आहेत का, याची खात्री करा.