छत्रपती संभाजीनगरात ‘ज्ञानराधा’च्या कुटेंवर १९ वा, तर 'राजस्थानी'च्या बियाणींवर चौथा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:26 PM2024-06-28T15:26:24+5:302024-06-28T15:27:32+5:30

शहरातल्या शेकडो ठेवीदारांच्या आक्रोशानंतर दोन गुन्हे दाखल, कुटेला आर्थिक गुन्हे शाखा ताब्यात घेणार

in Chhatrapati Sambhajinagar the 19th case was registered against the Suresh Kute of 'Gyanradha Multistate Bank', and the fourth case was registered against the Chandulal Biyani of Rajasthani Multistate Bank | छत्रपती संभाजीनगरात ‘ज्ञानराधा’च्या कुटेंवर १९ वा, तर 'राजस्थानी'च्या बियाणींवर चौथा गुन्हा

छत्रपती संभाजीनगरात ‘ज्ञानराधा’च्या कुटेंवर १९ वा, तर 'राजस्थानी'च्या बियाणींवर चौथा गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी व राजस्थानी मल्टिस्टेट कोट्यवधींच्या घोटाळ्यात आता शहरातही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील शेकडो ठेवीदारांच्या आक्रोशानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ज्ञानराधाच्या सुरेश कुटेवर आतापर्यंतचा हा १९वा, तर राजस्थानी मल्टिस्टेटच्या चंदुलाल बियाणीवर चौथा गुन्हा दाखल झाला आहे. यात बीट पोलिसांच्या अटकेत असलेल्या कुटेचा शहर आर्थिक गुन्हे शाखा लवकरच ताबा घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्ञानराधाचे आमिष : १२ टक्के व्याजदराचे...
शाखा किती : बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मिळून ५२ शाखा
ठेवीदार किती ? : सहा लाख ठेवीदार
विश्वास का वाढला : कुटेचे तिरुमला ऑईल, दुग्ध व्यवसाय, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रात बस्तान बसवल्याने विश्वास...
ठेवी कधी काढायला सुरुवात? : १० ऑक्टोबर २०२३ रोजी आयकर विभागाने कुटे समूहाच्या तिरुमला 

ऑईल कंपनीवर छापे पडल्यानंतर...
पहिला गुन्हा दाखल : फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल
१९ वा गुन्हा नोंद कोणी केला? : देवगिरी महाविद्यालयातून सेवानिवृत्त प्राध्यापक माधव हंडे यांनीदेखील विश्वास ठेवून सेवानिवृत्तीनंतर मिळालेले ३७ लाख रुपये गारखेडा शाखेत गुंतवले होते. सोसायटीने त्यांना ६ लाख ५८ हजारांचा परतावा दिला. नोव्हेंबर महिन्यात मात्र हंडे यांनी ठेव व उर्वरित परताव्याची मागणी केली. तोपर्यंत सोसायटी अडचणीत आली होती. त्यांच्यासह २४ लाख अडकलेल्या प्रियंका तेहरा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर १९वा गुन्हा दाखल झाला.
कुटेला अटक कधी? : बीड पोलिसांकडून ६ जून रोजी पुण्याच्या हिंजवडीतून अटक ...

जिल्हा पोलिसांनी घेतले अटक वॉरंट
पैठणमध्ये ९ जून रोजी कुटेवर ३ कोटी ६९ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक प्रशांत शिंदे याप्रकरणी तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कुटेच्या अटकेसाठी वॉरंट प्राप्त केले. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांची कोठडी संपताच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

फरार बियाणीवर चौथा गुन्हा
परळीतून प्रवास सुरू झालेल्या राजस्थानी मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष चंदुलाल बियाणी, जगदीश बियाणीसह संचालक मंडळावर शहरात चौथा गुन्हा दाखल झाला आहे. बजाज कंपनीतून सेवानिवृत्त झालेले सुनील खारगे यांनी फिर्याद दाखल केली. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे त्यांनी आकर्षक व्याजापोटी बियाणीच्या सोसायटीत गुंतवले होते. मार्च महिन्यात ही सोसायटीदेखील बुडीत निघाली. त्यामुळे खारगे यांचे वैयक्तिक ६२ लाख ३४ हजार व अन्य २० ठेवीदारांचे १ कोटी ९ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक तक्रारीत ठरावीक ठेवीदारांनीच तक्रार दाखल केली. शहरातील अन्य शाखांमधील ठेवीदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर फसवणुकीचा आकडा ३० ते ४० कोटींत जाण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. ठेवीदारांनी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे ठेवींची कागदपत्रे, पासबुकची प्रत व ओळखपत्रासह संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक संभाजी पवार यांनी केले आहे.

 

Web Title: in Chhatrapati Sambhajinagar the 19th case was registered against the Suresh Kute of 'Gyanradha Multistate Bank', and the fourth case was registered against the Chandulal Biyani of Rajasthani Multistate Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.