छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाबाधितांचा प्रवास दोन आकड्यात
By मुजीब देवणीकर | Published: April 8, 2023 12:32 PM2023-04-08T12:32:28+5:302023-04-08T12:33:23+5:30
सक्रिय रुग्णसंख्या ४९; शुक्रवारी १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे
छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शुक्रवारी १२ नवीन रुग्णांची भर पडली. विशेष बाब म्हणजे बाधित रुग्ण १८ ते ५० वयोगटातील आहेत. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या ४९ पर्यंत पोहोचली.
एप्रिल- मे महिन्यात रुग्णसंख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने संभाव्य रुग्णसंख्या डोळ्यासमोर ठेवून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. फेब्रवारी महिन्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. मार्च महिन्यात ११६ रुग्ण आढळून आले. एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक होत आहे. रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपात लक्षणे दिसून येत नसल्यामुळे घरीच उपचार घेत आहेत. तपासणी करून घेण्यासाठी संशयित रुग्णांची आरोग्य केंद्रात गर्दी होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आणि प्रिकॉशन डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे ७ दिवसात रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. शुक्रवारी दिवसभरात १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४९ इतकी आहे.
रुग्णसंख्येचा वाढता आलेख
वार- रुग्ण
शुक्रवार- १२
गुरुवार - ०९
बुधवार- ०४
मंगळवार- ०५
सोमवार- ०१
रविवार- ०७