छत्रपती संभाजीनगरात बाप्पांच्या स्वागताला अनेक ठिकाणी खड्डे
By मुजीब देवणीकर | Published: September 18, 2023 07:56 PM2023-09-18T19:56:24+5:302023-09-18T19:56:59+5:30
शहरात दरवर्षी एक हजारहून अधिक लहान-मोठी गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.
छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणपती बाप्पांचे मंगळवारी आगमन होत आहे. दरवर्षी गणेशाेत्सवापूर्वी महापालिकेकडून शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यात येतात. यंदा मंत्रिमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तिसंग्रामानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमुळे महापालिकेच्या यंत्रणेला फारसा वेळच मिळाला नाही. काही ठिकाणी डांबरी पद्धतीने पॅचवर्क केल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला.
मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघतोय. यंदा गणपती बाप्पा पाऊस घेऊन येतील, अशी अपेक्षा गणेशभक्तांना आहे. शहरात सार्वजनिक गणेश मंडळांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्तच तयारी केल्याचे दिसून येते. एकापेक्षा एक सरस देखावे भक्तांना पाहायला मिळतील. पण महापालिकेकडून पाहिजे तशी काळजी घेण्यात आली नाही, याचे शल्य गणेशभक्तांना आहे. दरवर्षी गणेशाेत्सवापूर्वी खड्डे डांबरी, सिमेंट तर कधी मुरूम-माती टाकून बुजविण्यात येतात. महापालिका प्रशासन दोन आठवड्यांपासून मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. त्यातच राज्य शासनाने १६ सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीचे संयोजकही महापालिका-स्मार्ट सिटीला करण्यात आले. हे शिवधनुष्य दिवसरात्र एक करून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पेलले.
काही ठिकाणी पॅचवर्क
औरंगपुरा व अन्य काही भागात डांबरी पद्धतीने पॅचवर्क करण्यात आले. अन्य भागात जिथे खड्डे बुजविले नाहीत, तेथेही काम लवकरच केले जाईल. शहागंज, सराफा आणि औरंगपुरा भाजीमंडई आदी रस्त्यांवर थोडेसे पॅचवर्क बाकी आहे. उद्या बहुतांश ठिकाणी कामे पूर्ण होणार आहेत.
- ए.बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा
विसर्जन विहिरींसह अनेक कामे बाकी
शहराच्या वेगवेगळ्या भागात दरवर्षी विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते. औरंगपुरा येथील मुख्य विसर्जन विहिरीच्या आसपासची संपूर्ण कामे बाकी आहेत. मुकुंदवाडी, एन-१२ इ. भागांतील कामेही प्रलंबित आहेत.
एक हजारावर गणेश मंडळे
शहरात दरवर्षी एक हजारहून अधिक लहान-मोठी गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. महापालिकेने गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी महापालिकेत एक खिडकी योजनाही सुरू केली आहे. गणेश मंडळांकडून शुल्क आकारणी न घेण्याचा आदेश शनिवारीच प्रशासक जी. श्रीकांत यांनी काढला.