छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडी फुटीच्या मार्गावर; पदाधिकाऱ्यांची नाराजी चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:55 PM2024-12-02T19:55:29+5:302024-12-02T19:56:04+5:30
पक्षात वाढत चाललेल्या वरिष्ठांच्या हस्तक्षेपाला कंटाळून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुसरी वाट धरण्याच्या तयारी असल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा दारुण पराभव का झाला? एकाही उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ वाचले नाही, या बाबींचे आत्मचिंतन करून रविवारी एका बैठकीत जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्तीचा ठराव पदाधिकाऱ्यांनी घेतला व तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला. दरम्यान, पक्षात वाढत चाललेल्या वरिष्ठांच्या हस्तक्षेपाला कंटाळून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुसरी वाट धरण्याच्या तयारी असल्याचे दिसून आले.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. यासंदर्भात रविवारी जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांची आत्मचिंतन बैठक झाली. क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा महासचिव मंगेश निकम, संघराज धम्मकीर्ती, जिल्हा सचिव संदीप जाधव, जिल्हा सोशल मीडियाप्रमुख प्रवीण जाधव, संपर्कप्रमुख गणेश खोतकर, जिल्हा सहसचिव अशोक खिल्लारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, जिल्हा सदस्य रवी रत्नपारखे यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत निवडणुकीतील अपयशाचे खापर उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांवर फोडण्यात आले. उमेदवार निश्चित करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. या उमेदवारांनी निवडून येण्यासाठी अपेक्षित प्रचार यंत्रणा राबविली नाही. स्थानिक पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांकडे मतदार याद्या देणे किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कसलेही नियोजन केले नाही. निष्क्रिय कार्यकर्ते किंवा पक्षाच्या धोरणाविरुद्ध कृती करणारे कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा कार्यकारिणीला नाहीत. यासंदर्भात राज्याचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतात. त्यामुळे पक्षात पदाधिकारी-कार्यकर्त्यांना फारसे स्वातंत्र्य नाही. ऐनवेळी उमेदवार बदलण्याचे प्रकार वाढल्यामुळे पक्षाला अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे सध्याच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त कराव्यात, असा एकमुखी ठराव आजच्या आत्मचिंतन बैठकीत घेण्यात आला.