छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:27 PM2024-11-21T14:27:47+5:302024-11-21T14:29:05+5:30
९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १८३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य बुधवारी (दि.२०) ईव्हीएममध्ये बंद झाले. जिल्ह्यातील ३२७३ मतदान केंद्रांवर ३२ लाख २ हजार ७५१ पैकी सुमारे २२ लाख ४१ हजार ४४९ मतदारांनी १८३ उमेदवारांपैकी कुणाला पसंती दर्शविली, हे २३ रोजी स्पष्ट होणार आहे. सुमारे ९ लाख ६१ हजार ३०२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. ७० टक्के मतदान सायंकाळी ६ वाजेपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी व्यक्त केला. २०१९ च्या तुलनेत ५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६५.४५ टक्के मतदान झाले होते.
बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदानाची गती कमी होती. दुपारपर्यंत त्यात विशेष अशी वाढ झालेली नव्हती. मतदारांचा उत्साह कमी असल्याने उमेदवारांनी मतदान बाहेर काढण्यासाठी कायकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर मतदारांना केंद्रापर्यंत आणले. दुपारी ३ वाजेनंतर अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघात उमेदवारांनी केंद्रांना भेटी दिल्या. सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया संपली, तर काही बूथवर मतदार जास्त असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यात पैठण, औरंगाबाद पश्चिम, पूर्व मतदारसंघातील सुमारे आठ केंद्रांचा समावेश होता.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मतदान असे..
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत १८.९८ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३३.८९ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४७.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६०.८३ टक्के मतदान झाले. सुरुवातीपासून सिल्लोड मतदारसंघात मतदानाची टक्केवारी जास्त होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सिल्लोड मतदारसंघात ७०.४६ तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी ५२.६८ मतदानाची नोंद झाली होती.
मतदान केल्याचा फोटो व्हायरल
पश्चिम मतदारसंघातील एका केंद्रावर एका मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याचा फोटो त्याने सोशल मीडियात व्हायरल केला. मतदान केंद्राबाहेर मोबाइल ठेवण्याच्या सूचना असताना मतदाराने केंद्रात मोबाइल नेलाच कसा, यावर प्रश्नचिन्ह आहे.
दिव्यांग मतदारांचे हाल!
प्रत्येक केंद्रावर ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १०७ मध्ये दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा आढळून आली नाही. यामुळे दिव्यांग मतदारांचे हाल झाले.
सायंकाळी ५ पर्यंत असे झालेले मतदान
मतदारसंघ............... मतदान
सिल्लोड............. ७०.४६
फुलंब्री................ ६१.४९
गंगापूर............... ६०.५६
वैजापूर.............. ६४.२१
पैठण................... ६८.५२
कन्नड................ ६२.२०
पूर्व ................. ५५.७६
पश्चिम............. ५२.६८
मध्य................. ५३.९८
एकूण .............. ६०.८३