संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद

By विजय सरवदे | Published: March 16, 2023 06:54 PM2023-03-16T18:54:56+5:302023-03-16T18:55:24+5:30

आज दुपारी भरपावसात मुख्यालयासमोरील मंडप व रस्त्यावर संपकरी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून नागरिकांचे लक्ष वेधले.

In Chhtrapati Sambhajinagar Zilla Parishad service collapsed due to strike of employees, health workers, teachers | संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद

संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका, शिक्षक, ग्रामसेवकांसह जवळपास सर्वच संवर्गाचे कर्मचारी संपात मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे गुरुवारी तिसऱ्या दिवसी जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली. 

संपात सहभागी असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार अधिवेशनासाठी माहिती पाठविण्याचे काम केले. विशेष म्हणजे, गुरुवारी जिल्ह्यातील दोन हजारांपैकी ६०० ते ७०० शाळा गुरुजींअभावी बंद होत्या. पहिल्या दिवसापासून सकाळी १०:३० ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपकरी कर्मचारी डोक्यावर ‘जुनी पेन्शन’ लिहिलेली टोपी घालून जि. प. मुख्यालयासमोरील सभामंडपात सहभागी होतात. तिथे ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडतात. गुरुवारी दुपारी भरपावसात मुख्यालयासमोरील मंडप व रस्त्यावर संपकरी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून नागरिकांचे लक्ष वेधले.
तथापि, सध्या सर्वत्र साथरोगामुळे आबालवृद्ध त्रस्त आहेत. अशातच संपामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. हजेरी मस्टरवर सह्या करू नका; पण रुग्णसेवा द्या, अशी विनंती अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी (महिला-पुरुष), औषध निर्माण अधिकारी अधिकाऱ्यांची विनंती धुडकावून देत संपात सहभागी होत आहेत. प्राथमिक केंद्रांत बाह्य रुग्णसेवा जवळपास विस्कळीत झाली आहे. मात्र, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची अडवणूक टाळली जात आहे.
मार्चअखेरपूर्वी निधी खर्च करण्यासाठी जवळपास सर्वच विभागांची लगीनघाई सुरू असताना संपामुळे नियोजन, कार्यारंभ आदेश, मोजमाप पुस्तिकेनुसार बिलांचा ताळेबंद लावणे यासह सर्वच प्रक्रिया ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवकही संपात सहभागी असल्यामुळे ग्रामपंचायतींची कामेही खोळंबली आहेत.

जोपर्यंत शासन निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत रोज संपाची तीव्रता वाढवली जाईल, असा निर्णय जि. प. कर्मचारी, शिक्षक समन्वय समितीचे संजय महाळंकर, प्रदीप राठोड, सुरेश गायकवाड, बाबासाहेब काळे, पदमसिंग राजपूत, सुभाष महेर, विजय साळकर, गणेश धनवई, दिलीप ढाकणे, डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत, गोविंद उगले, ज्ञानेश्वर सोनवणे, सुषमा राऊतमारे, सुनंदा कुंभार आदींनी जाहीर केले.

संपामुळे बंद असलेल्या शाळा
तालुका- बंद शाळा
छत्रपती संभाजीनगर- १४
फुलंब्री- ००
सिल्लोड- ६४
सोयगाव- ०९
कन्नड- २००
खुलताबाद- ००
गंगापूर- ५१
वैजापूर- ८०
पैठण- ८५

Web Title: In Chhtrapati Sambhajinagar Zilla Parishad service collapsed due to strike of employees, health workers, teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.