भर चौकात तिघे कुख्यात गुन्हेगारावर तुटून पडले; चाकूचे वार, रॉडने ठेचल्याने गुन्हेगार कोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:00 PM2022-04-28T13:00:32+5:302022-04-28T13:06:01+5:30
कोमात गेलेल्या गुन्हेगारावर मुकुंदवाडी आणि सिडको ठाण्यातच आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद : हर्सूल कारागृहातून तीन महिन्यांपूर्वी बाहेर आलेला कुख्यात गुन्हेगार प्रवीण उर्फ पऱ्या सोपान साबळे याला भर चौकात ठेचल्याची घटना आंबेडकरनगर चौकात बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पऱ्या गंभीर जखमी झाला असून, काेमात गेला आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पऱ्यास पोलीस आयुक्तांनी मागील वर्षी एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात ठेवले होते. तीन महिन्यांपूर्वी तो बाहेर आला. त्यानंतर, लगेच लूटमार केली. काही दिवस फरार राहिला, पण सिडको पोलिसांनी त्याला मुकुंदवाडीतील सासुरवाडीतून पकडले. जामिनावर सुटल्यानंतर तो मुकुंदवाडीत राहत होता. पऱ्याने एका महिलेला शिवीगाळ केली होती. यावरून हे प्रकरण घडले.
बुधवारी सकाळी तो आंबेडकरनगर चौकात हल्लेखोरांना दिसला. तीन हल्लेखोरांपैकी दोघांच्या हातात रॉड, एकाच्या हातात चाकू होता. तिघे पऱ्याला भर चौकात मारीत होते. तो रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावर, मानेवर, हातावर रॉड, चाकूचे वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्यानंतर हल्लेखोर निघून गेले.
माहिती सिडको पोलिसांनी मिळाल्यानंतर, उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास, रतन डोईफोडे घटनास्थळी आले. पोलिसांनी गंभीर जखमी पऱ्याला घाटीत दाखल केले. त्याला रात्री उशिरापर्यंत शुद्ध आलेली नव्हती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढण्यास सुरुवात केली. पऱ्याच्या पत्नीने फिर्याद देण्यास नकार दिला असून, पोलिसांनी भावाला रात्री उशिरा बोलावले होते.
बघ्यांची तुफान गर्दी
भर चौकात तिघे पऱ्यावर तुटून पडले. रॉड, चाकूने मारहाण करीत होते. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची मोठी गर्दी होती. त्यातील कोणीही सोडविण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.
लुटमार, हाणामारीचे गुन्हे
पऱ्यावर मारहाण करून लुटणे, विनाकारण मारहाण करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुकुंदवाडी आणि सिडको ठाण्यातच आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.